मुंबई: भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि आमदार बबनराव पाचपुते (Babanrao Pachpute) यांचे पुतणे साजन पाचपुते (Sajan Pachpute) हे आज शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सायंकाळी पाच वाजता मातोश्री या निवासस्थानी भेट घेऊन हा पक्षप्रवेश केला जाणार आहे. त्यामुळे भविष्यात राज्यात आणखी एका काका विरुद्ध पुतण्याची राजकीय लढत पाहायला मिळू शकते, कारण साजन पाचपुते यांना ठाकरे गटात मोठी जबाबदारी दिली जाणार असल्याची देखील माहिती आहे.


बबनराव पाचपुते यांचे भाऊ सदाअण्णा पाचपुते यांच्या निधनानंतर पाचपुते कुटुंबात फूट पडलेली पाहायला मिळत होती. त्याचा फटका आमदार पाचपुते यांना सरपंच पदाच्या निवडणुकीत बसला.


...आणि त्या विजयानंतर पाचपुते कुटुंबात वादाची ठिणगी पडली


साजन पाचपुते हे भाजपाचे आमदार बबनराव पाचपुते यांचे पुतणे आहेत. काही महिन्यांपूर्वी झालेल्या काष्टी गावच्या सरपंचपदाच्या निवडणुकीत साजन पाचपुते विरुध्द प्रतापसिंह बबनराव पाचपुते अशी लढत झाली आणि साजन यांनी बहुमताने विजय मिळवला आणि त्यावेळी पाचपुते कुटुंबात वादाची ठिणगी पडली. 


मध्यंतरी साजन पाचपुते यांनी श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूकही आमदार पाचपुते यांच्या गटाविरुध्द लढवली आणि जिंकलीही होती.


आतापर्यंत कोणत्याही पक्षाला नव्हता पाठिंबा


साजन पाचपुते यांच्याकडे काष्टी तालुक्यातील  सरपंच आणि बाजार समितीचे संचालक ही पदं असतानाही राजकीयदृष्ट्या साजन पाचपुते कुठल्याही पक्षात नव्हते. मात्र, साजन पाचपुते आणि ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांचे घनिष्ठ संबंध आहेत. मागील महिन्यात मुंबईत माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची साजन पाचपुते यांनी भेट घेतली, त्यावेळी साजन हे ठाकरे गटाच्या पक्षात प्रवेश करण्यावर शिक्कामोर्तब झाला होता.


भाऊसाहेब वाकचौरेंचा याआधी झाला पक्षप्रवेश


दरम्यान, शिर्डी लोकसभेचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी देखील आपल्या काही समर्थकांसह 23 ऑगस्टला ठाकरे गटात प्रवेश केला. 23 ऑगस्ट रोजी हा शिवबंधन सोहळा दुपारी 12 वाजता पार पडला होता, मातोश्रीवर उद्धव ठाकरेंनी त्यांच्या हाती शिवबंधन बांधलं. प्रशासकीय सेवेतून राजकारणात आलेले भाऊसाहेब वाकचौर 2009 साली खासदार झाले. वाकचौरेंनी तत्कालीन दिग्गज उमेदवार रामदास आठवले यांचा पराभव केला. त्यानंतर त्यांनी काँग्रेस आणि भाजपमध्येही राजकीय प्रवास केला आणि सध्या वाकचौरे शिवसेना ठाकरे गटात आहेत.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Ajit Pawar: मराठा आरक्षणाबाबत आज बैठक, अजित पवार उपस्थित राहणार? सलग तीन दिवस सर्व कार्यक्रम राखीव