मुंबई : जालना इथल्या मराठा आंदोलकांवर (Maratha Agitation) झालेल्या लाठीहल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी दाखला (Kunbi) देण्याच्या संदर्भात आज निर्णय होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत आज मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) उपसमितीची बैठक होणार आहे. या संदर्भात अभ्यास करण्यासाठी महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली अकरा जणांची समिती गठीत करण्यात आली होती. मराठा समाजाच्या महसुली व शैक्षणिक नोंदी, निजाम काळात संस्थानिकांनी दिलेल्या सनदी, निजाम काळात झालेले करार, राष्ट्रीय दस्तऐवज व इतर कागदपत्रे, मराठा समाजातील लोकांची वंशावळ यावर समितीने अभ्यास केला आहे. जालन्यात झालेल्या घटनेमुळे मराठा समाजात मोठ्या प्रमाणात  नाराजी आहे. त्यामुळे सरकार तात्काळ हा निर्णय घेत असल्याची चर्चा आहे.


सह्याद्री अतिथीगृहावर होणाऱ्या मराठा आरक्षणाच्या उपसमितीच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, शंभुराज देसाई, गिरीश महाजन, उदय सामंत, दादा भुसे या मंत्र्यांची प्रमुख उपस्थिती असेल. या बैठकीत प्रामुख्याने सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाबाबत दाखल असलेल्या क्युरेटिव्ह पिटीशनबाबत आढावा घेतला जाईल. तसेच जालना येथील आंदोलन मागे घेण्यासाठी आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांवर ठोस निर्णय घेण्याची दाट शक्यता आहे.


मराठवाड्यातील आठ जिल्हाधिकाऱ्यांकडून कुणबी नोंदींचा अहवाल सादर


तत्पूर्वी मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीआधी महत्त्वाची माहिती एबीपी माझाच्या हाती लागली आहे. मराठवाड्यातील आठ जिल्हाधिकाऱ्यांनी कुणबी नोंदीचे अहवाल आज औरंगाबाद विभागीय आयुक्तांना सादर करण्यात आले आहेत. मंत्रिमंडळ उपसमिती बैठकीआधी 624 पानांचा अहवाल औरंगाबाद विभागीय आयुक्तांना सादर करण्यात आला आहे. यामध्ये चार प्रमुख मुद्द्यांवरील माहिती देण्यात आली आहे. मराठा समाजाच्या महसुली व शैक्षणिक नोंदी, निजाम काळातील संस्थानिकांनी दिलेल्या सनदी, निजाम काळात झालेले करार, राष्ट्रीय दस्ताऐवज आणि इतर कागदपत्रं, तसंच मराठा समाजातील लोकांची वंशावळाची माहिती या अहवालात आहे. सन 1350 म्हणजे कृषी वर्ष 1954-55 पर्यंत जिल्ह्यातील बारा गावांमध्ये कुणबी मराठा नोंदी आढळल्या आहेत.


आंदोलनादरम्यान लाठीचार्ज, दगडफेक 


जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन सुरु आहे. 29 ऑगस्टपासून मराठा मोर्चा समन्वयक मनोज जरांगे यांच्यासह 10 जण आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनाला बसले आहेत. त्यांच्या समर्थनासाठी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. उपोषणकर्त्या आंदोलकांची प्रकृती खालावण्याची भीती निर्माण झाली होती. त्यामुळे उपोषण आंदोलन चिघळू नये यासाठी पोलिसांकडून 1 सप्टेंबर रोजी उपोषण करणाऱ्या आंदोलकांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्याला आंदोलकांनी विरोध केला. त्यानंतर दोन्ही बाजूने रेटारेटी झाली. पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. तर, आंदोलकांकडून दगडफेक करण्यात आल्याची माहिती आहे. आक्रमक झालेल्या आंदोलकांना आवरण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला आणि लाठीचार्ज केला. या घटनेत आंदोलकांसह पोलीस देखील जखमी झाले आहेत.


हेही वाचा


Maratha Reservation Protest : जालना: मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या उपोषणकर्त्यांवर पोलिसांचा लाठीचार्ज; आंदोलकांना आवरण्यासाठी हवेत गोळीबार