मुंबई : सेलेब्रिटीज, प्रभावी व्यक्तिमत्वे, उद्योजक आणि अगदी विशिष्ट संस्थांचेही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर लक्षावधी फॉलोअर्स असतात. मग ते इन्स्टाग्राम असो, फेसबूक असो किंवा ट्विटर असो. प्रसिद्ध नावांद्वारे टाकल्या गेलेल्या प्रत्येक पोस्टला हजारो फॉलोअर्स मिळतात. प्रख्यात सेलेब्रिटीज त्यांच्या सोशल मीडिया हॅण्ड्ल्सची प्रमोशन करण्यासाठी एक नवीन मार्ग चोखाळत आहेत. 'अप्सरा आली' फेम सोनाली कुलकर्णी आणि 'पुढे धोका आहे' फेम सई ताम्हणकर यांनीही आता हा मार्ग निवडला आहे. या दोन देखण्या अभिनेत्रींनी चिंगारी अॅप या आपल्या मातीत विकसित करण्यात आलेल्या शॉर्ट व्हिडिओ अॅप प्लॅटफॉर्मशी सहयोग केला आहे. याद्वारे त्या त्यांचे चित्रपट, इव्हेंट्स, सामाजिक उपक्रम, त्यांच्या आवडी-निवडी या सगळ्याची प्रसिद्धी करणार आहेत आणि राज्यातील भल्यामोठ्या प्रेक्षकवर्गाशी संवादही साधणार आहेत.


सई आणि सोनाली या दोघीही त्यांच्या लेटेस्ट अपडेट्स, वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज रोज चिंगारी अॅपवर पोस्ट करणार आहेत. या वर्षाच्या सुरुवातीला चिंगारीने, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सर्वोत्तम भारतीय अॅप्स प्रकल्प विभागात, ‘आत्मनिर्भर भारत’ नवोन्मेष आव्हान पुरस्कार पटकावला. चाहत्यांशी संवाद साधण्यासाठी चिंगारी अॅप या अभिनेत्रींच्या मुलाखती दाखवेल, त्या सध्या करत असलेल्या उपक्रमांचे सृजनशील मार्गाने प्रमोशन करेल, हे सर्व रोचक स्वरूपात सादर करेल आणि महाराष्ट्रभरातील त्यांच्या चाहतावर्गाला आकर्षित करून घेईल. “चिंगारीचा हा अनन्यसाधारण उपक्रम आहे. महाराष्ट्राच्या हृदयापर्यंत पोहोचण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे आणि चिंगारीच्या संभाव्य प्रेक्षकांना हे आकर्षित करून घेईल,” असे चिंगारी अॅपचे सहसंस्थापक व सीओओ तसेच या मातीचे पुत्र दीपक साळवी म्हणाले. दीपक यांना त्यांच्या मातृभाषेचा व संस्कृतीचा खूप अभिमान आहे आणि म्हणूनच मराठी अभिनेत्यांसोबत त्यांचे घनिष्ट संबंध आहेत.


अभिनेत्री सई ताम्हणकर म्हणाली, "चिंगारी या देशी अॅपवर मी आपल्या मायबोलीशी अधिक जोडली जाणार आहे. कारण इथे आहे भाषा निवडण्याचा पर्याय. इथे मी माझ्या चाहत्यांना वेगवेगळे चॅलेंजेस देणार आहे, टिप्स देणार आहे. माझ्या प्रोजेक्ट्सची माहिती आणि सेटवरच्या गमतीजमतीची माहितीसुद्धा देणार आहे."


अभिनेत्री सोनाली कुलकर्णी म्हणाली, "चिंगारी हे खऱ्या अर्थाने भारतीय अॅप आहे. मी चिंगारीवर आली असून माझे फोटो, व्हिडिओ आणि बिहाइंड द सीन्स असे बरेच अपडेट्स इथे असणार आहेत. 'बी व्होकल फॉर लोकल' अशा शब्दांत आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्थानिक-स्वदेशी स्टार्ट अपसना प्रोत्साहन देण्याचं आवाहन केलेलं आहे. चिंगारी हा खऱ्या अर्थाने भारतीय, स्वदेशी, स्थानिक ब्रँड आहे. चिंगारी हा स्वदेशी ब्रँड असल्याने मी त्याच्याशी जोडले जाण्याचा मला विशेष आनंद होत आहे. माझे अनेक मराठी फॅन्स आहेत, ज्यांचं त्यांच्या मराठी भाषेवर प्रेम आहे, ज्यांना मराठी भाषेचा अभिमान आहे आणि मुख्य म्हणजे, मराठी भाषेत सोशल मीडियावर कनेक्ट व्हायला त्यांना आवडतं. इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कॉन्टेन्टबाबत नेहमीच खूप गोंधळ- केऑस असतो, पण चिंगारी अॅपवर मात्र भाषा निवडण्याचे योग्य पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळे चिंगारी अँपवर मी मराठीत संवाद साधणार आहे आणि जगभरातील माझ्या चाहत्यांशी मराठी भाषेत कनेक्ट होणार आहे.


“34 दशलक्ष डाउनलोड्ससह चिंगारीने महाराष्ट्रात वापरकर्त्यांचा वर्ग चांगलाच विस्तारला आहे. निव्वळ पुण्यातच चिंगारीने 20 लाखांपेक्षा जास्त युजरबेस बनवला आहे. या अॅपला महाराष्ट्रीय लोकांकडून दाद मिळत आहे. ही एक महाराष्ट्रीय म्हणून माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे,” असेही दीपक साळवी म्हणाले. दीपक साळवी पुढे म्हणाले, “चिंगारी अॅपने एक रोमांचक पाऊल टाकले आहे आणि त्यामुळे अनेक प्रादेशिक सेलिब्रिटीजना स्वतःची व चित्रपटांची प्रसिद्धी करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. ज्यामुळे चित्रपट तसेच टीव्ही कलाकारांच्या प्रसिद्धीसाठी चिंगारी महत्वपूर्ण घटक म्हणून प्रभावी काम करेल. या चॅनलच्या माध्यमातून सेलेब्रिटीज अधिक मोठ्या प्रेक्षकवर्गापर्यंत पोहोचू शकतील, त्यांना आपल्या उपक्रमांची माहिती देत राहू शकतील आणि त्यांच्या आगामी चित्रपट व अन्य मनोरंजनविषयक उपक्रमांबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण करू शकतील.