मुंबई : "माझ्याविरोधातील याचिका ही निव्वळ राजकीय हेतून प्रेरित आहे. याचिकेतील मागणी आणि आरोपात कोणतंही तथ्य नाही. त्यामुळे ही याचिका फेटाळून लावत याचिकाकर्त्यांना मोठा आर्थिक दंड आकारावा, जेणेकरुन कोर्टाचा वेळ खाणाऱ्या अशा याचिका दाखल होणार नाहीत," असं उत्तर साध्वी प्रज्ञासिंह ठाकूरने एनआयए कोर्टात सादर केलं आहे.



"तर साध्वी प्रज्ञाने निवडणूक लढवावी की लढू नये, याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाने निर्णय घ्यावा. हा निर्णय आमच्या अखत्यारीत येत नाही," असं उत्तर राष्ट्रीय तपास यंत्रणेने कोर्टाला दिलं आहे. "तसंही याआधीच आम्ही या प्रकरणात साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना 'क्लीन चीट' दिलेली आहे, आम्ही त्यावर आजही ठाम आहोत," असं एनआयएने कोर्टाला कळवलं आहे.


2008 च्या मालेगाव बॉम्बस्फोटात मुलगा गमावलेल्या नासिर बिलाल यांनी एनआयए कोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर कोर्टाने साध्वी आणि तपासयंत्रणेला उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले होते. मंगळवारी या दोघांनी आपलं उत्तर कोर्टापुढे सादर केलं.


साध्वी प्रज्ञा सिंहच्या लोकसभा उमेदवारीविरोधात एनआयए कोर्टात याचिका
साध्वीने आपल्या उत्तरात म्हटलं आहे की, "याचिकाकर्त्यांची मागणी कोणत्याही कायद्याला अनुसरुन नाही. भोपाळमधून उमेदवारी अर्ज दाखल करताना साध्वीने आपल्याविरोधात दाखल गुन्ह्याची तसंच कोर्टात सुरु असलेल्या खटल्याची माहीती दिलेली आहे. संविधानाने दिलेल्या अधिकारानुसार कोणत्याही कायदा एखाद्या आरोपीला निवडणूक लढवण्यापासून रोखू शकत नाही. तसंच याचिकाकर्त्यांनी साध्वीच्या प्रकृती अस्वस्थ्याचं कारण खोटं असल्याचा दावा केला असला तरी या दाव्यात तथ्य नाही."


मुंबई उच्च न्यायालयाने केवळ प्रकृती अस्वस्थ असल्याच्या कारणावरुन जामीन दिलेला नाही, तर साध्वीचा या प्रकरणात थेट सहभाग असलेल्याचे तपास यंत्रणेकडे ठोस पुरावे उपलब्ध नाहीत हे प्रमुख कारण हायकोर्टाने जामीन मंजूर करताना नोंदवलं होतं. तसंच हायकोर्टाने जामीन दिला तेव्हा साध्वी स्तनाच्या कर्करोगाने त्रस्त होती. जामीन मिळताच तिच्यावर लखनौमधील राम मनोहर लोहिया रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर साध्वीने आधी बंगळुरु आणि नंतर लखनौमध्ये आयुर्वेदिक उपचार घेण्यास सुरुवात केली. सध्याही त्यांच्यावर भोपाळमध्ये आयुर्वेदिक उपचार सुरु असल्याची माहिती एनआयए कोर्टात देण्यात आली.