मुंबई : अँटालिया स्फोटकं आणि मनसूख हिरण हत्याकांड प्रकरणी अटकेत असलेल्या सचिन वाझे आणि रियाझ काझी यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए कोर्टानं या दोघांना 19 मेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान सचिन वाझेनं कोर्टाकडे काही खाजगी गोष्टींसाठी केलेला अर्ज कोर्टानं स्वीकारला आहे. त्यानुसार वाझे यांना जीन्स, टी-शर्ट, स्पोर्ट्स शूज, वॉशिंग पावडर, साबण, मीठ, साखर आणि डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनप्रमाणे औषधं देण्यास कोर्टाची परवानगी आहे. या गोष्टी त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती अथवा वकिलामार्फत जेलमध्ये पाहचवण्याचे निर्देश न्यायाधीश राहुल भोसले यांनी दिले आहेत.


उद्योगपती मुकेश अंबानींच्या निवासस्थानाबाहेर जिलेटिनच्या 20 कांड्या आणि धमकीचं पत्र ठेवलेली एक स्कॉर्पिओ गाडी बेवारसपणे सोडण्यात आली होती. तसेच त्या गाडीचे मालक मनसूख हिरण यांच्या अनाचक झालेल्या मृत्यूप्रकरणी पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना एनआयएकडून अटक करण्यात आली होती. तसेच या प्रकरणात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या वाझेंच्या युनिटमधील एपीआय रियाझुद्दीन काझी यांनाही या प्रकरणातील पुरावे मिटवणे, प्रकरणाची माहिती असून देखील सहकार्य केल्याचा आरोप ठेवत अटक झाली आहे. 5 मे रोजी या दोघांची न्यायालयीन कोठडी संपत होती. शुक्रवारी या दोघांनाही न्यायाधीश राहुल भोसले यांच्यासमोर हजर करण्यात आलं. तेव्हा, न्यायालयाने दोघांच्याही कोठडीत वाढ करत त्यांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.


दरम्यान या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या बुकी नरेश गोरनं मुंबई सत्र न्यायालयात विशेष एनआयए कोर्टात जामीनासाठी अर्ज दाखल केला आहे. या गुन्ह्यांत वापरण्यात आलेली बनावट नावाची सिम कार्ड ही बुकी नरेश गोरनं पुरवली होती. त्यानं ती कार्ड विनायक शिंदेकडे सुपुर्द केली होती. या आरोपावरून एटीएसनं नरेश गोरला अटक केली त्यानंतर त्याला एनआयएकडे हस्तांतरित करण्यात आलं. कोर्टानं याप्रकरणी एनआयएला उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत.