मुंबई : सचिन वाझे तपासात सहकार्य करत नाहीत म्हणून त्यांना अटक केली, अशी स्पष्ट माहिती एनआयएनं सोमवारी मुंबई सत्र न्यायालयात दिली आहे. इतकंच काय तर, सचिन वाझे ह चौकशीला येताना सोबत आपला फोन घेऊन आले नव्हते, तसेच ते कुटुंबियांचा नंबरही देण्यास तयार नाहीत म्हणून मग शेवटी त्यांच्या पोलीस स्टेशनलाच रात्री उशिरा त्यांच्या अटकेची माहिती द्यावी लागली, अशी माहिती तपासयंत्रणेनं कोर्टात दिली. आपली अटक बेकायदा असून आपल्याला वकिलांशीही भेटण्यास दिलं जात नसल्याचा आरोप करत सचिन वाझे यांची एनआयए कोर्टात याचिका केली आहे. त्यावर सोमवारी सुनावणी झाली.


मात्र, एनआयएनं हे आरोप फेटाळून लावत वाझेंना वकिलाशी भेटू देण्यात काहीच अडचण नाही. मंगळवारी भेटीच्या वेळा कोर्टाला कळवू असं स्पष्ट केलं. तसेच एनआयएच्या इंट्रोगेशन रूममध्ये सीसीटिव्ही कैमेरा नसल्याची वाझेंच्यावतीनं कोर्टात तक्रार करण्यात आली. हादेखील आरोप एनआयएनं फेटाळून लावला. वाझेंना शनिवारी दिवसभर एसपींच्या केबिनमध्ये बसवलं होतं. जिथं कॅमेरा नाही, पण इंट्रोगेशन रूममध्ये सीसीटिव्ही असल्याची एनआयएकडनं कोर्टात कबूली देण्यात आली. वाझेंची चौकशी करताना त्यांच्या केस डायरीत काही अनियमितता आढळल्या म्हणून सहाय्यक आयुक्त पदाच्या अधिकाऱ्यांना चौकशीसाठी बोलावलं होतं असंही एनआयएनं कोर्टाल सांगितलं. मंगळवारी याप्रकरणी पुन्हा सुनावणी होणार आहे.


दरम्यान, अंबानी यांच्या घराबाहेरील सापडलेली स्फोटकं आणि मनसूख हिरेन मृत्यू प्रकरणात संशयाच्या भोवऱ्यात अडकलेले गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांच्या भावाने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए)ने माझा भाऊ सचिनला बेकायदा ताब्यात घेऊन अटक केली. त्यामुळे सचिनला मुंबई उच्च न्यायालयात हजर करण्याचे आदेश देण्यात यावेत, अशी विनंती या याचिकेतून करण्यात आली असून त्यावर लवकरच यावर सुनावणी अपेक्षित आहे.


काय आहे याचिका?
सचिन वाझे यांना एनआयएकडून शनिवारी रात्री उशीरा अटक करण्यात आली. त्यानंतर एनआयए विशेष न्यायालयाने त्यांना 25 मार्चपर्यंत एनआयए कोठडी सुनावली आहे. त्याविरोधात सचिन वाझे यांचा भाऊ सुधर्म यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत अॅड. सनी पुनामिया यांच्यामार्फत हेबियस कॉर्पस याचिका दाखल केली आहे. दिवंगत मनसुख हिरेन यांच्या पत्नी विमला यांचा वापर करून काही राजकीय प्रभावी नेत्यांनी सचिन वाझेंना बळीचा बकरा बनवला आहे. तसेच अँटिलिया प्रकरणात ठोस पुरावे नसतानाही सचिनला त्यात गोवण्यात आल्याचा आरोपही याचिकेतून करण्यात आला आहे. तसेच एनआयएनंही बेकायदा पद्धतीने सचिनला ताब्यात घेऊन अटक केल्याचा आरोपही याचिकेतून करण्यात आला आहे. या प्रकरणात एनआयएनं मुंबई पोलिसांच्या मोटार वाहन दुरुस्ती विभागातून अंबानी प्रकरणी वापरण्यात आलेली इनोव्हा गाडी जप्त केली असून ही गाडी वाझे यांच्या शासकीय पथकाने वापरल्याचा दाव या याचिकेतून केला आहे. त्यामुळे या प्रकरणात वाझे यांचा सहभाग असल्याचे पुरावे असून या कटात अन्य व्यक्तीचाही सहभाग असल्याचा संशयही एनआयएने व्यक्त केला आहे.