मुंबई : "आचरेकर सरांनी आम्हाला आणि आमच्यामधील क्रिकेटला घडवलं आहे. शिवाजी पार्कात क्रिकेट शिकवत असताना अनेकदा ते आम्हाला स्टम्प आणि टपल्यांचा प्रसाद द्यायचे". अशी आठवण आज माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकरने सांगितली. सचिन आणि त्यासारखे अनेक दिग्गज क्रिकेटपटू भारताला देणारे प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांचे 2 जानेवारीला निधन झाले. त्यांच्या स्मृतीसभेत सचिन बोलत होता.

क्रिकेटचे द्रोणाचार्य रमाकांत आचरेकर सरांचे 2 जानेवारी रोजी वयाच्या 87 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. दादरच्या शिवाजी पार्कमध्ये आज त्यांची स्मृतीसभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी सचिन तेंडुलकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, माजी क्रिकेटर विनोद कांबळी यांच्यासह अनेक माजी खेळाडू व आचरेकर सरांचे शिष्य उपस्थित होते. सचिनसह इतर मान्यवरांनीदेखली यावेळी आचरेकर सरांच्या आठवणींना उजाळा दिला.

सचिन म्हणाला की, "शिवाजी पार्कात क्रिकेट खेळायला येणे, म्हणजेच आमच्यासाठी मंदिरात येण्याप्रमाणे होतं. या मंदिरात आम्हाला प्रसादही मिळायचा. आचरेकर सरांच्या हातून आम्ही कधी टपल्या तर कधी स्टम्प्सचा प्रसाद खायचो. सर आमच्या खेळाकडे पूर्ण लक्ष द्यायचे. आमच्या चुका सांगायचे. अनेकदा आम्हाला प्रसाद (शिक्षा)देखील मिळायचा."

...आणि विनोदला मोठा प्रसाद मिळाला!
सचिनने विनोद कांबळीला मिळालेल्या प्रसादाचा एक किस्सादेखील यावेळी सांगितला. सचिन म्हणाला की, "आम्ही जेव्हा शिवाजी पार्कमध्ये क्रिकेटचा सराव करायचो, सामने खेळायचो तेव्हा आचरेकर सर नेहमी लपून आमचे सामने पहायचे. एकदा क्रॉस मैदानावर आम्ही सामना खेळत होतो. सर एका झाडाच्या मागे लपून सामना पाहत होते. मी स्ट्राइकला होतो, तर विनोद कांबळी नॉन स्ट्रायकर होता. परंतु अचानक माझ्या लक्षात आले की, माझा नॉन स्ट्राईकर दिसत नाही. तेवढ्यात आम्ही विनोदला पतंग उडवताना पाहिले.

सामन्यानंतर सरांनी आमच्या चुकांची यादी माझ्याकडे देऊन वाचायला सांगितली. मी ती यादी वाचत होतो. त्या यादीत 'विनोद काईट..' असा एक मुद्दा लिहिला होता. हे मला काही समजलं नाही. त्यानंतर मी पुढे काही वाचण्याच्या आत एक वेगळाच आवाज आला. सरांनी विनोदला चांगला मार दिला. त्याचा आवाज आम्ही ऐकत होतो.