मुंबई :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोलापूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आमच्या युवक काँग्रेसच्या आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना बेदम मारलं. ही लोकशाही आहे की हुकूमशाही? हिटलरही असा वागला नव्हता, अशी टीका कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केली आहे. पंतप्रधानांचं भाषण हे निवडणुकीचं भाषण होतं, असेही ते म्हणाले.

सोलापूरला जाहीर केलेल्या योजना काँग्रेस सरकारच्या काळातील असून, त्यातील बहुतांश तरतूद काँग्रेस सरकारच्या काळातील आहे.  सोलापूर - तुळजापूर - उस्मानाबाद हा रस्ता 2010 मध्ये मी स्वतः मंजूर करून आणला होता. इतरांच्या कामाचं क्रेडिट मोदी घेत आहेत. यांच्याकडे नवीन योजना नाहीत आणि आमच्या योजना राष्ट्राला अर्पण करत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.

विविध प्रकल्पांच्या भूमिपूजनासाठी गेल्या काही महिन्यात अनेक वेळा राज्यात आलेल्या पंतप्रधानांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याबाबत चकार शब्द काढला नाही. राज्यात 17 हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यातील एकाही शेतकऱ्याच्या घरी जायला पंतप्रधानांना वेळ मिळाला नाही. दुष्काळग्रस्त भागात आले पण शेतकरी, शेती, तरुण यांच्यावर एक शब्दही  काढला नाही, असे शिंदे म्हणाले.

इथल्या हँडलूम- टेक्सटाईलचा कपडा पॅरा मिलिटरीच्या युनिफॉर्मसाठी का देत नाही अशी टीका मोदींनी माझ्यावर केली. आज एक इंचभरही कपडा देण्याचं काम मोदींनी पंतप्रधान झाल्यानंतर केलेले नाही, असेही ते म्हणाले. सत्तेत आल्यानंतर 100 दिवसात धनगर समाजाला आरक्षण देऊ असे आश्वासन भाजपने दिले होते. मात्र पंतप्रधान तीन वेळा सोलापुरात येऊनही अद्याप धनगर आरक्षण का दिलं नाही? असा सवालही त्यांनी केला.

आपल्या उद्योगपती मित्रांसाठी राफेल तथा अन्य व्यावसायिक प्रकरणात प्रधानमंत्री मध्यस्थी योजना लागू करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या व्यवसायात कोणीही प्रतिस्पर्धी नको म्हणून आकांडतांडव करत आहेत. मिशेल मामा आणि मोदी मामा हे व्यावसायिक प्रतिस्पर्धीच आहेत. त्यामुळेच मोदींची बिनबुडाची आगपाखड सुरू आहे, अशा शब्दांत शिंदे यांनी टीका केली.

मोदी सरकारची उलटी गिनती सुरू झाली असून, 90 दिवसानंतर देशात राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली देशात काँग्रेसचे येणार आहे. त्यामुळे हे सर्व प्रकल्प नवीन सरकारच्या कार्यकाळातच पूर्ण होणार आहेत. मोदींनी आता भूमीपूजने करून लोकांची फसवणूक करण्याची हौस भागवून घ्यावी. ‘बाजारात विकासाच्या तुरी आणि मोदीजी पोकळ बाता मारी!’,अशा शेलक्या शब्दात शिंदे यांनी पंतप्रधानांवर खोटारडेपणाचा आरोप केला.