मुंबई : मुंबईतल्या देवनार डंपिंग ग्राऊंडला वारंवार लागणाऱ्या आगीबाबत खासदार सचिन तेंडुलकरने चिंता व्यक्त केली आहे. याप्रकरणी आज शिवाजीनगर भागातल्या पालिकेच्या एम वॉर्डमध्ये सचिन आणि पालिका आयुक्त अजय मेहता यांची बैठक पार पडली.


 
देवनारच्या आगीमुळे स्थानिकांना श्वसनाचे त्रास होत असून त्यावर त्वरित उपाययोजना करावी अशी मागणी याआधीही सचिनने पत्राद्वारे पालिकेकडे केली होती. त्यामुळे सचिनच्या पाठपुराव्याने तरी देवनारवासियांचा त्रास कमी होणार का याकडे आता लक्ष लागलं आहे.

 
देवनार डम्पिंग ग्राऊण्डमुळे परिसरातील झोपडपट्टीवासियांच्या प्रकृतीला त्रास होत आहे. या परिसरातील नागरिकांचं जीवनमान सुधारण्यास पालिका अधिकाऱ्यांनी मदत करावी, असं त्याने पत्रात म्हटलं होतं.

 

 

शिवाजीनगर आणि बैंगनवाडीसारखे परिसर प्रदुषणाचे आगार झाले आहेत. कचरा व्यवस्थापनात मुंबई मागे पडत असल्याचं मागेच हायकोर्टाने अधोरेखित केलं होतं, असंही सचिनने पत्रात नमूद केलं होतं.

 

 

सचिन तेंडुलकरने देवनारच्या शिवाजीनगर परिसरातील तीन वसाहतींना भेट दिली होती. त्यानंतर स्थानिकांचे प्रश्न पालिका आयुक्तांच्या निदर्शनास आणण्याचा निर्णय त्याने घेतला. पिण्याचं पाणी, सांडपाण्याचा निचरा, स्वच्छता, आरोग्य आणि बँकेच्या सुविधा, माध्यमिक शाळा यासारख्या महत्त्वाच्या गोष्टी मर्यादित प्रमाणात असल्याचं सचिनने पत्रात म्हटलं होतं.

 

संबंधित बातम्या :


देवनार डंम्पिंग ग्राऊण्डवर तोडगा शोधा, सचिनचं पालिका आयुक्तांना पत्र