मुंबई: दारुकंपन्यांसंदर्भात केलेल्या वक्तव्यावरुन अडचणीत आलेल्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी बोचरी टीका केली आहे.
पंकजांचा उल्लेख नवाब मलिकांनी 'दारुवाली बाई' नावाने केला आहे. काल मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत नवाब मलिक बोलत होते.
मृणालताई गोरे किंवा अहिल्याबाई रांगणेकर यांचा मुंबईकर 'पाणीवाली बाई' म्हणून गौरव करायचे. तशा पंकजा मुंडे यांची 'दारुवाली बाई' म्हणून ओळख झाल्याची बोचरी टीका नवाब मलिक यांनी केली आहे.
दारु कंपन्यांमध्ये संचालक पद मिळवण्यासाठी पंकजाताईंनी दोन डीन म्हणजे डायरेक्टर आयडेन्टिफिकेशन नंबर वापरल्याचा आरोप नबाव मलिक यांनी केला. राष्ट्रवादीनं यासंदर्भातले कागदपत्रे उघड केल्यानं पंकजाताईंच्या अडचणीत भर पडल्याचं मलिक म्हणाले.
त्यामुळे जलसंधारण मंत्री असलेल्या पंकजा मुंडे यापुढे 'दारुवाली बाई' म्हणूनही ओळखल्या जातील असं मलिक म्हणाले.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा इशारा
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांचा दारुवाली बाई असा उल्लेख केल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे.
नवाब मलिक यांनी पंकजा मुंडे यांची जाहीर माफी मागावी, अन्यथा त्यांना महाराष्ट्रात कुठेही फिरु देणार नाही, असा इशारा स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी दिला. ते सांगली जिल्ह्यातील सावळज येथे आयोजित सरपंच परिषदेत बोलत होते.
पंकजा मुंडे यांच्या पतीचा औरंगाबाद एमआयडीसीत बियरचा कारखाना आहे.