मुंबई: मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल ठाण्यात बोलत असताना आपल्या तीन अटी शिवसेनेसमोर मांडल्या. दरम्यान, फडणवीस यांच्या भाषणाला शिवसेननं आज 'सामना'तून उत्तर दिलं आहे. 'मुंबईवर सदैव फडकणारा भगवा उतरवण्याची स्वप्ने ज्यांनी पाहिली त्यांची राजकीय थडगी येथेच बांधली गेली. इतिहास तेच सांगतो.' अशी टीका शिवसेनेनं भाजपवर केली आहे.
'महापालिकेच्या कारभारात पक्षीय पातळीवर हस्तक्षेप करु नका, भाजपच्या विकास कामात खोडा घालू नका, महापालिकेत पारदर्शक कारभार असावा.' या अटी मुख्यमंत्र्यांनी सेनेसमोर ठेवल्या आहेत. त्यानंतर आज सामनातून भाजपवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला.
'तुम्ही तुमची काय ती बुलेट ट्रेन, मेट्रो ट्रेन देत आहात, ठीक आहे हो! पण त्या विकासाच्या बुलडोझरखाली जी कुटुंबे बेघर आणि निर्वासित होणार आहेत त्यांच्या भवितव्याचे काय?' असा सवालही सामनातून आज विचारण्यात आला आहे.
एक नजर सामनाच्या अग्रलेखावर:
ही लढाईच आहे!
* शिवसैनिकांच्या रक्तामध्ये स्वार्थाचा नाही, तर राष्ट्रीयत्वाचा आणि महाराष्ट्र धर्माचा जबरदस्त ‘धर्म’ शिवसेनेने निर्माण केला आहे. हा ‘धर्म’च पुन्हा मुंबईसह महाराष्ट्राचे रक्षण करण्याची ताकद शिवसेनेला देत असतो. शिवसेनेचा, शिवरायांचा तेजोमय भगवा पुनः पुन्हा मुंबई-ठाण्यावर सतत डौलाने फडकत असतो तो त्यामुळेच. मुंबईवर सदैव फडकणारा भगवा उतरवण्याची स्वप्ने ज्यांनी पाहिली त्यांची राजकीय थडगी येथेच बांधली गेली. इतिहास तेच सांगतोय.
* महाराष्ट्राच्या राजकारणाला दिशा देणाऱया निवडणुकींचे महाभारत सुरू झाले आहे. मुंबईसह दहा महानगरपालिकांच्या निवडणुकांची घोषणा होताच संपूर्ण देशाचे लक्ष मुंबईत काय होणार याकडे लागले. एका बाजूला उत्तर प्रदेशात राजकीय यादवी पेटली आहे. मुलायमसिंग यादवांच्या घरात जे सत्तेचे ‘रामायण-महाभारत’ घडवले जात आहे, त्या यादवीतून आपल्या तोंडात लोण्याचा गोळा पडेल काय यासाठी राजकीय पक्षांची घालमेल सुरू आहे. त्या भडकलेल्या यादवीत तेल ओतण्याचे मतलबी काम सुरू आहे. कारण आता राजकारण हे विचारांचे व जनहिताचे उरले नसून ते मतलबाचे बनले आहे. अशा सर्व मतलबी लोकांच्या छाताडावर पाय रोवून मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे, पिंपरी-चिंचवड अशा महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांत भगवा फडकवण्यासाठी महाराष्ट्राची जनता सज्ज झाली आहे.
* उत्तर प्रदेशसारख्या राज्यात पंतप्रधानांची प्रचार सभा ही काही फक्त भाजपचे नेते मोदी म्हणून होत नाही. श्रीमान मोदी हे देशाचे पंतप्रधान म्हणूनच तिथे सत्तेच्या सर्व लवाजम्यासह अवतरतात व मतदारांसमोर आश्वासनांची पोतडी रिकामी करतात. सर्वच मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत तेच म्हणावे लागेल. अर्थात काँग्रेस राजवटीतसुद्धा यापेक्षा वेगळे काही घडत नव्हते. लोकशाहीचे हे दुर्दैव आहे! सत्ताधारी पक्ष जेव्हा अशा निवडणुकांत उतरतो तेव्हा संपूर्ण यंत्रणा, प्रशासन, पैसा अशा ‘गुटगुटीत’ गोळ्या खाऊन आलेली सूज त्याच्या वागण्या-बोलण्यातून दिसत असते. अर्थात अशा सगळ्यांना पुरून उरलेली शिवसेना मुंबई-ठाण्यासह राज्यभरात भगव्याचे तेज टिकवून आहे.
* मुंबई-ठाणे अशा शहरांना विकासाच्या नावाखाली केंद्राकडून जे काही दिले जाते त्यात राजकीय मतलबच जास्त. तुम्ही तुमची काय ती बुलेट ट्रेन, मेट्रो ट्रेन देत आहात, ठीक आहे हो! पण त्या विकासाच्या बुलडोझरखाली जी कुटुंबे बेघर आणि निर्वासित होणार आहेत त्यांच्या भवितव्याचे काय? त्यांना त्यांचे घर नव्याने कुठे मिळणार आहे? असे जनहिताचे प्रश्न विचारणारे जर विकासाचे मारेकरी आणि गैरकारभारी ठरत असतील तर मग तुमच्या नोटाबंदीमुळे जे काही शे-पाचशे लोक नाहक मेले त्यासही विकासाचे बळी म्हणावे काय? निदान आमच्या महाराष्ट्रात व महाराष्ट्राच्या राजधानीत तरी आम्ही निरपराध्यांना असे नाहक चिरडू देणार नाही. मग कुणी आमच्या पाठीत कितीही वार केले तरी पर्वा नाही.