मुंबई : मालेगाव येथे 2008 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटप्रकरणात वापरण्यात आलेली बाईक मी घटनेच्या एक वर्ष आधीच विकली होती. त्यामुळे मी या बॉम्बस्फोटासाठी बाईक दिल्याचा तपास यंत्रणांचा दावा आधारहिन आहे, असा युक्तीवाद साध्वी प्रज्ञा सिंगच्या वतीने गुरूवारी उच्च न्यायालयात करण्यात आला.


या बॉम्बस्फोटप्रकरणी एटीएसने साध्वीसह इतर आरोपींना अटक केली. 2011 मध्ये याचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) सोपवण्यात आला. एनआयएने यातील काही आरोपींवरील मोक्का काढण्याची शिफारस विशेष न्यायालयाकडे केली. त्यानंतर साध्वीने जामिनासाठी अर्ज केला. विशेष सत्र न्यायालयाने साध्वीचा जामीन फेटाळला. साध्वीने जामीनासाठी उच्च न्यायालयात याचिका केली आहे.

न्या. रणजित मोरे व न्या. डॉ. शालिनी फणसाळकर-जोशी यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी सुरू आहे. "बॉम्बस्फोटासाठी वापरलेली बाईक मी एक वर्ष आधी सुनील जोशीला विकली होती. बाईक विकण्याआधी त्याचे कर्ज फेडले होते. कालसांगराने कोणाकडून ही बाईक घेतली हे मला माहिती नाही. एटीएसने जबरदस्तीने जबाब घेतल्याचे काही साक्षीदारांनी एनआयएला सांगितले आहे. माझ्याविरोधातील मोक्का काढण्याची शिफारस एनआयएने विशेष न्यायालयात केली आहे. त्यामुळे जामीन मंजूर करावा", अशी मागणी साध्वीच्या वतीने न्यायालयात करण्यात आली. त्याची नोंद करून घेत न्यायालयाने ही सुनावणी एक आठवड्यासाठी तहकूब केली.