मुंबई : ओला आणि उबर या कंपन्यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून मराठी चालकांनी आणि काही संघटनांनी एकत्र येऊन नवीन टॅक्सी सेवा सुरु करायचं ठरवलं आहे. या सेवेचं उद्घाटन 12 मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. सह्याद्री स्मार्ट सेफ प्रायव्हेट लिमिटेड म्हणजेच एस 3 असं या नव्या सेवेचं नाव असेल.
मुंबईतील रस्त्यावर आता मराठी चालकांच्या प्रयत्नातून तयार झालेली एस 3 कॅब धावताना दिसणार आहे. ओला, उबर यांसारख्या कंपन्यांच्या कॅब अॅपच्या माध्यमातून वापरणाऱ्या ग्राहकांना एस 3 कॅब हा नवा पर्याय मिळणार आहे. विशेष म्हणजे ज्या चालकांना ओला-उबरच्या फसव्या आश्वासनामुळे मोठा तोटा झाला, त्यांनी मिळून ही नवी सेवा सुरु केली आहे.
कशी असेल एस 3 कॅब सेवा?
गेल्या वर्षीपासून या एस 3 कॅबच्या निर्मितीसाठी प्रयत्न सुरु होते. यामध्ये ओला आणि उबर यांच्या सेवेमध्ये जे अडथळे आहेत, ते दूर करण्याचा प्रयत्न केला गेलाय. चालक आणि प्रवासी यांच्या दोघांच्या दृष्टीने ज्या गोष्टी महत्वाच्या आहेत, त्यांना प्राधान्य दिलं गेलं आहे.
विशेष म्हणजे यात केवळ मोबाईल अॅपद्वारेच नाही, तर कॉल करुनही आपण टॅक्सी बोलावू शकतो. यामुळे ज्यांना स्मार्टफोन वापरता येत नाही, त्यांनाही या सेवेचा लाभ घेता येईल. तर दुसरीकडे ओला-उबरपेक्षा कमी भाडे या सेवेमध्ये आकारलं जाईल आणि भाडे पद्धती देखील वेगळी असेल, असा दावा संस्थापकांनी केला आहे.
सुरक्षेसाठी विशेष सुविधा
अशा सेवांमध्ये सुरक्षा महत्त्वाची असते. जो प्रवासी प्रवास करतोय त्याच्यासोबत चालकाचीही सुरक्षा महत्त्वाची आहे. त्यामुळेच एकदा का प्रवास सुरु झाला, की मग चालकाच्या मोबाईलच्या फ्रंट कॅमेऱ्यामधून संपूर्ण प्रवास ऑटोमॅटिक सर्व्हरकडे रेकॉर्ड केला जाईल. त्यामुळे लगेचच मदत मिळणं शक्य होईल.
गेल्या एका वर्षापासून प्रफुल्ल शिंदे आणि राजेश काळदाते हे दोन मराठी तरुण नवीन टॅक्सी सेवेची संकल्पना घेऊन फिरत होते. मात्र त्याला आर्थिक साथ मिळत नव्हती. अखेर काही महिन्यांअगोदर ती साथ भारत फ्रेटने दिली.
येत्या 12 तारखेला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या सेवेचं लोकार्पण केलं जाईल. आत्ताच 800 हून जास्त चालकांनी या कंपनीमध्ये आपली नोंदणी केली आहे. तर 10 टॅक्सी युनियनने आपला पाठिंबा दर्शवून चालक देणार असल्याचं सांगितलं आहे. सध्या तरी केवळ मुंबईमध्येच ही सेवा असेल. मात्र येणाऱ्या काळात इतर शहरातही ही सेवा सुरु होईल.
वाढणाऱ्या स्पर्धेत काही मराठी तरुणांनी उद्योजक बनण्याचं स्वप्न पाहून सुरु केलेली ही सेवा आहे. त्याला मुंबईकर कसा प्रतिसाद देतात हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल.
एस 3 कॅब... मुंबईत 12 मेपासून मराठी तरुणांची नवी कॅब सेवा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
10 May 2018 08:23 PM (IST)
या सेवेचं उद्घाटन 12 मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. सह्याद्री स्मार्ट सेफ प्रायव्हेट लिमिटेड म्हणजेच एस 3 असं या नव्या सेवेचे नाव असेल.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -