ठाणे : मुंब्र्यातील अनेक बँक खातेदारांच्या खात्यातून अचानक रक्कम वजा झाल्याचं कळल्यानंतर एकच खळबळ उडाली. सोमवारी (11 सप्टेंबर) रोजी 19 जणांच्या बँक खात्यातून मोठी रक्कम गायब झाली. त्यामुळं बँक खातेदारांनी आपआपल्या बँकेच्या शाखेत तक्रार करणाऱ्यासाठी धाव घेतली.


मुंब्र्यातील विविध बँकेच्या 19 खातेदारांच्या खात्यातील पैसे सोमवारी अचानक गायब झाले. ही घटना उघडकीस आल्यानंतर, नागरिकांनी बँकांशी संपर्क साधला. तर दुसरीकडे अफरातफरीची तक्रार करण्यासाठी मुंब्र्यातील नागरिकांनी मुंब्रा पोलीस ठाण्यात एकच गर्दी केली होती.

या प्रकरणावर एका बँक खातेदारानं सांगितलं की, “गेल्या आठ ते दहा दिवसात ज्या खातेदारांनी आपल्या एटीएमद्वारे व्यवहार केले, त्याच खात्यातील रक्कम अचानक गायब झाली आहे.”

हा प्रकार उघडकीस आल्यानंतर मुंब्रा पोलिसांनी बँकेच्या शाखा प्रबंधकांची बैठक घेतली. हा ऑनलाईन फ्रॉड आहे की एटीएम सेंटरमध्ये कऱण्यात आलेली हेराफेरी आहे याचा पोलीस तपास करत आहेत.

दरम्यान, या प्रकरणाचा तपास सायबर शाखेकडे सोपवण्यात आला असून, आरोपींचा छडा लावण्याचं आव्हान त्यांच्यासमोर आहे.