Thane News Update : ठाण्यामध्ये येत्या 20 मार्च रोजी कर्करोगाप्रति जागरूकता निर्माण करण्यासाठी ‘रन फॉर कॅन्सर’ संकल्पनेच्या अंतर्गत टोरेंट जितो ठाणे हाफ मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आलं आहे. जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन (जितो ठाणे) आणि जितो एज्युकेशनल अँड मेडिकल ट्रस्ट २० मार्च २०२२ रोजी आयोजित होणाऱ्या टोरेंट जितो ठाणे हाफ मॅरेथॉनच्या पहिल्या आवृत्तीच्या आयोजनासाठी सज्ज झाले आहेत. टोरेंट जितो ठाणे हाफ मॅरेथॉनचे आयोजन ठाणे महानगरपालिका, टाटा मेमोरियल हॉस्पिटल आणि महावीर जैन हॉस्पिटल यांच्या समन्वयाने केले जाणार आहे.
हाफ मॅरेथॉनचा लोगो आणि रेस डे जर्सीचे अधिकृत उद्घाटन ठाणे जिल्ह्याचे महापौर नरेश म्हस्के आणि ठाणे महानगरपालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्या हस्ते करण्यात आले. या हाफ मॅरेथॉनचे प्रमुख उद्दिष्ट कर्करोगाप्रति जागरूकता निर्माण करण्याचे असून या कार्यक्रमाची मध्यवर्ती संकल्पना ‘रन फॉर कॅन्सर’ ही आहे. या उपक्रमातून क्रीडाप्रेमी, व्यावसायिक धावपटू, सुरूवात करणारे आणि सर्व ठिकाणच्या लोकांना एकत्र आणले जाईल. देशभरातील हजारो धावपटू आणि प्रेक्षक या रेसमध्ये सहभागी होतील आणि या उपक्रमाला ठाणे जिल्ह्यातील सर्वांत मोठ्या धावण्याच्या उपक्रमांपैकी एक बनवतील.
हाफ मॅरेथॉन (21 किमी), १० किमी रेस आणि ५ किमी रन फन हौशी तसेच कुटुंबे आणि मुलांसाठी असतील. ही रेस सर्व वयोगटातील, क्रीडा क्षमता असलेल्यांसाठी खुली असेल. या रेसला रेमंड ग्राऊंड, ठाणे येथून सुरूवात होईल.
हाफ मॅरेथॉन (२१ किमी) आणि १० किमी या वेळेवर आधारित स्पर्धा असतील. २० मार्च २०२२ रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण झालेले सहभागी (हाफ मॅरेथॉन), १६ वर्षे वयाच्या (१० किमी) आणि १२ वर्षे वयाच्या (५ किमी) खेळाडूंना यात सहभाग घेता येईल. विजेत्यांना एकूण १८ लाख रूपयांची पारितोषिके दिली जातील. ती विविध वर्गवारींमध्ये वितरित करण्यात येतील.
“विविध प्रकारचे अॅथलीट, अभ्यागत आणि मान्यवर यांच्यासह टोरेंट जितो ठाणे हाफ मॅरेथॉनच्या पहिल्या आवृत्तीचे अनावरण करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. ठाण्याच्या रस्त्यांवर जागतिक दर्जाची हाफ मॅरेथॉन विशेषतः कोविडच्या जागतिक साथीनंतर एक कार्यरत आणि सुदृढ जीवनशैलीचा प्रसार करण्यासाठी आणणे ही आमच्यासाठी उत्साहाची बाब आहे,'' असे मत जितो ठाणे चॅप्टरचे अध्यक्ष महेंद्र जैन यांनी व्यक्त केले.
''टोरेंट जितो ठाणे हाफ मॅरेथॉन फक्त रेस नाही. ही एका हेतूसाठी धावण्याची उत्तम संधी असून त्यातून कर्करोगाच्या विविध स्वरूपांबाबत जागरूकता निर्माण केली जाईल आणि या गंभीर आजाराने ग्रस्त समाजातील कमकुवत वर्गातील लोकांना मदत केली जाईल,''असे मत जितो एज्युकेशनल अॅण्ड मेडिकल ट्रस्टचे व्यवस्थापकीय विश्वस्त अजय अशर यांनी व्यक्त केले.
या रेसचे आयोजन कोविड सुरक्षा नियमांनुसार केले जाईल. टोरेंट जितो ठाणे हाफ मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी सहभागींचे दोन्ही लसीकरण झालेले असले पाहिजे किंवा त्यांचा आरटीपीसीआर रिपोर्ट निगेटिव्ह असला पाहिजे. आयोजकांकडून सुरूवात करणाऱ्यांना मॅरेथॉनच्या दिवसासाठी तयार करण्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम आणि फिटनेस टिप्स दिल्या जातील.