मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर आहे. मुंबई, पुण्यासह इतर ठिकाणी राहणाऱ्या चाकरमान्यांना एसटीने कोकणात प्रवास करता येणार आहे. मात्र यासाठी काही नियमावलीचं पालन करावं लागणार आहे. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी याबाबत माहिती दिली.


अनिल परब यांच्या नेतृत्त्वाखाली कोकणातल्या आमदारांची बैठक झाली होती. या बैठकीत गणेशोत्सवासाठी चाकरमानी कोकणात कसे जाणार? यावर चर्चा झाली. मात्र, केंद्र आणि राज्य सरकारच्या नियमानुसार चाकरमान्यांना कोकणात सुखरुप पाठवणार आणि आणणार असं आश्वासन अनिल परब यांनी दिलं. तसंच कोकणातल्या चाकरमान्यांवरुन कोणीही राजकारण करु नये, असा टोलाही अनिल परब यांनी विरोधकांना लगावला.


एसटी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, थकित वेतनासाठी 550 कोटी रुपये मंजूर


काय आहेत नियम?




  • कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या लोकांना 10 दिवस क्वॉरंटाईन राहावं लागणार.

  • 12 ऑगस्टनंतर जे कोकणात जातील त्यांना कोरोना टेस्ट बंधनकार, चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर कोकणात जाण्यास परवानगी.

  • आज संध्याकाळी कोकणात जायला बुकिंग सुरू करण्यात येणार आहे.

  • एसटी 22 लोकांच्या ग्रुपने बुकिंग केलं तर मुंबईहून थेट गावी जाऊ शकतील. मात्र, जेवणासाठी एसटी बस थांबणार नाही, जेवण घेऊन जावं लागणार.

  • एसटीने जे जाणार त्यांना ई पास लागणार नाही. मात्र, एसटी शिवाय जे जाणार त्यांना इ पास घ्यावा लागणार आहे.

  • खासगी बसेसला एसटी पेक्षा दीडपट पैसे घेण्याचा अधिकार आहे, त्याशिवाय कोणी मागणी केली तर लोकांनी पैसे देऊ नये. कोणी अधिकचे पैसे आकारले तर कारवाई करणार असल्याचं परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिले.

  • दरवर्षी 2200 गाड्या जातात आम्ही 3 हजार गाड्याची तयारी ठेवली आहे. 12 तारखेपर्यंत जे जाणार त्यांना घरीच क्वॉरंटाईन राहावं लागणार आहे.


क्वॉरटाईन कालावधीवरुन पुन्हा गोंधळ
गणेशोत्सवात कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना क्वॉरटाईनच्या मुद्यावरुन मतमंतातरे असताना आता ग्रामपंचायतींनी ठराव घेऊन स्थानिक पातळीवर 14 दिवसांचाच क्वॉरटाईन कालावधी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी त्यांनी चाकरमान्यांना 7 ऑगस्टची डेडलाईन दिली आहे. सात ऑगस्टपर्यंत तुम्ही या, चौदा दिवस क्वॉरटाईन व्हा आणि मगच गणेशोत्सव साजरा करा, असा नियम घालून दिला आहे. कुडाळ तालुक्यातील डिगस ग्रामपंचायतीने तर 7 तारखेनंतर येणाऱ्या चाकरमान्यांना एक हजार रुपयांचा दंडच आकारला आहे. पाच ते दहा टक्के चाकरमान्यांनासाठी आम्ही पूर्ण गावातील लोकांच आरोग्य धोक्यात टाकू शकत नसल्याचं येथील सरंपचांच मत आहे. सरकारने कोणताही निर्णय घेतला तरी 14 दिवस क्वॉरटाईन आणि उशिरा येणाऱ्यांना एक हजार दंड असा निर्णय आपण बैठकीत घेतल्याचं त्यांनी सांगितलं.


Ganeshotsav 2020 | चाकरमान्यांबाबत आज मोठ्या निर्णयाची शक्यता