मुंबई : मुंबई आणि उपनगराला पावसाने अक्षरश: झोडपलं आहे. ठिकठिकाणी पाणी गुडघाभर पाणी साचलं असून वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुंबई आणि उपनगरांमधील सर्व शासकीय कार्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे, मदत व पुनर्वसन विभागाने ही माहिती दिली आहे. हवामान विभागाने अतिवृष्टीचा अंदाज वर्तवला असून खबरदारी म्हणून शासकीय कार्यालये आज बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. अत्यावश्यक सेवा देणाऱ्या यंत्रणा मात्र सुरुच राहणार आहेत


आज आणि उद्या मुंबई आणि उपनगरात हवामान विभागाने रेड अलर्ट जाहीर केला आहे. येत्या 24 तासात मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघरमध्ये अतिवृष्टीचा तर दक्षिण कोकणात पुढील 48 तासात जोरदार पावासाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. याशिवाय मध्य महाराष्ट्रातही जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.





समुद्राला भरती, घराबाहेर न पडण्याचं बीएमसीचं आवाहन
मुंबई शहर आणि उपनगरात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली असून समुद्राला दुपारी 12 वाजून 47 मिनिटांनी भरती येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आलं आहे.





पावसामुळे लोकल, रस्ते वाहतुकीवर परिणाम
अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सुरु असलेल्या लोकल वाहतुकीवरही पावसाचा परिणाम झाला आहे. पावसामुळे लोकल ट्रेनची वाहतूक ठप्प झाली आहे. सायन रेल्वे स्टेशनवर प्लॅटफॉर्मपर्यंत पाणी साचलं आहे. तर सखल भागांमध्ये पाणी साचल्याने रस्ते वाहतूकही विस्कळीत झाली आहे. पाणी साचल्याने हिंदमाता फ्लायओव्हर, अंधेरी सबवे, मालाड सबवे, मिलन सबवे, किंग सर्कल, शिंदेवाडी, दादर टीटी हे मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत.


कांदिवलीत डोंगराचा भाग कोसळला
कांदिवलीत परिसरात पश्चिम द्रुतगती मार्गालगत दरड कोसळली. रस्त्यावर माती आणि दगडांचा ढीग साचला असून मिरारोडहून मुंबईला येणारी वाहतूक ठप्प झाली आहे. दरड हटवण्याचं काम सुरु आहे.


Mumbai Rains | कांदिवलीजवळ डोंगराचा भाग कोसळला; पश्चिम द्रुतगती मार्गावरील वाहतुकीवर परिणाम



Mumbai Rains | मुसळधार पावसानं अत्यावश्यक सेवेतील लोकलसेवेवर परिणाम; पश्चिम रेल्वे ठप्प