मुंबई : राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर आहे. कर्मचाऱ्यांच्या थकित वेतनासाठी 550 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी या निर्णयाची ट्विटरवरुन माहिती दिली. तसंच कर्मचाऱ्यांचे पगार लवकर होतील, असं आश्वासनही त्यांनी दिलं. या बैठकीला अजित पवार, अनिल परब आणि गृहराज्य मंत्री सतेज पाटील उपस्थित होते.


अनिल परब यांनी ट्वीटमध्ये लिहिलं आहे की, "माननीय मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचे आभार! उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी 550 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. एसटी कर्मचाऱ्यांचे पगार लवकरच होतील."





एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी 550 कोटी मंजूर झाल्याने एसटीच्या 1 लाख 10 हजार कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे. एसटी महामंडळाचे शासनात विलनीकरण करावं यासाठी एसटी कर्मचारी आणि संघटना आग्रही आहेत. एसटीचे शासनात विलनीकरण करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी एसटी कर्मचाऱ्यांनी केली आहे.