मुंबई : सोशल नेटवर्किंग साईटवर हायकोर्ट आणि महिला न्यायमूर्तींबाबत आक्षेपार्ह मजकूर लिहीणाऱ्या आरटीआय कार्यकर्ता केतन तिरोडकर यांना मुंबई उच्च न्यायालयानं न्यायालयाचा अवमान केल्याबद्दल तीन महिन्यांची कैद आणि दोन हजार रूपये दंड ठोठवला आहे. या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देता यावं यासाठी तूर्तास सहा आठवड्यांची स्थगिती देण्यात आली आहे.


न्यायमूर्ती अभय ओक, न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती आर.एम. सावंत यांच्या पूर्ण खंडपीठानं गुरूवारी याबाबत आपला अंतिम निकाल जाहीर केला. त्याआधी गुरूवारी सकाळी न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांनी तिरोडकर यांना याचसंदर्भातील एका प्रकरणात झालेल्या तब्बल 11 महिन्यांच्या अटकेनंतर जामीन मंजूर केला. 25 हजारांच्या जातमुचलक्यावर हा जामीन मंजूर करण्यात आला आहे. तसेच अशाप्रकारचं कृत्य पुन्हा करणार नाही, केल्यास हा जामीन रद्द करण्यात यावा असं हमीपत्रही तिरोडकर यांच्याकडून लिहून घेण्यात आलं आहे.


माजी पत्रकार असलेल्या केतन तिरोडकर यांनी मराठा आरक्षण, आदर्श घोटाळा, दाभोळकर-पानसरे हत्याकांड, 26/11 चा दहशतवादी हल्ला, सरकारी आरक्षणातून मिळणारी घर, न्यायाधीशांच्या घरांसाठी आरक्षित भूखंड अशा अनेक महत्त्वाच्या आणि संवेदनशील विषयांवर हायकोर्टात जनहीत याचिका दाखल केल्या आहेत.


बरीच वर्ष पत्रकारीता केल्यानंतर तिरोडकरांनी आरटीआय अंतर्गत मिळालेल्या माहीतीच्या आधारे भ्रष्टाचार आणि अनेक गैरप्रकारांना वाचा फोडली. दरम्यानच्या काळात ते सतत या ना त्या कारणानं चर्चेत राहीले. मात्र साल 2017 मध्ये तिरोडकरांनी समाजमाध्यमांवर टाकलेल्या काही आक्षेपार्ह मजकूरांनंतर ते अडचणीत सापडले.


रिया पालांडे आत्महत्या प्रकरणात त्यांनी गुन्हा दाखल असलेल्या पोलीस कुटुंबाच्या बाजूने वक्तव्य करत पोलीस आयुक्तांनाच टार्गेट केले. अशात आपल्याला पकडण्याचे खुले आव्हानही त्यांनी पोलिसांना दिले होते. सोशल मीडियावर पोलीस आयुक्त, नवघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह पोस्ट टाकणे सुरू असतानाच 6 डिसेंबर 2017 रोजी तिरोडकरांना विनयभंगाच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली होती.


जुलै 2017 मध्ये तिरोडकरांनी एका महिलेच्या बदनामीची पोस्ट व्हायरल केली होती. त्यानुसार, 21 जुलै रोजी तिरोडकरांवर विनयभंग, शिवीगाळ आणि आयटी अ‍ॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच गुन्ह्यात सायबर पोलिसांनी त्यांच्यावर अटकेची कारवाई केली होती.