मुंबई : मुंबईत म्हाडाचं घर घेणाऱ्यांसाठी खुशखबर आहे. मुंबईतील म्हाडाच्या घरांच्या किमती कमी केल्या जाणार आहेत. म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी 'एबीपी माझा'ला ही माहिती दिली. गेल्या सोडतीतील म्हाडाच्या लोअर परळमधील म्हाडाच्या घरांच्या किमती कोटींच्या घरात होत्या. घरांच्या अव्वाच्या सव्वा किमतींमुळे घरांकडे नागरिकांनी पाठ फिरवली होती.
करोडो रुपयांची घरं सर्वसामान्यांना परवडणारी नव्हती, त्यामुळे कुणीही खरेदी केली नाहीत. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय म्हाडाची जी घरं विकली गेली नाहीत, त्यांच्याही किंमती कमी करण्यात येणार आहेत. परवडणारी घरं म्हणून म्हाडाच्या घरांकडे मुंबईकरांचा ओढा असतो.
गेल्या वर्षी म्हाडातर्फे लोअर परेलमध्ये उच्च उत्पन्न गटातील दोन घरांची किंमत दोन कोटींच्या जवळपास होती. 44.21 चौरस मीटरच्या या घरांची किंमत 1 कोटी 95 लाख, 67 हजार 103 होती. तर लोअर परेलमधीलच 33.82 चौरस मीटरच्या घरांची किंमत 1 कोटी 42 लाख, 96 हजार 517 रुपये होती. उच्च उत्पन्न गटात सुमारे दीड कोटी रुपये किंमत असलेली 34 घरं लोअर परेलमध्ये होती.
मात्र गेल्या काही वर्षात म्हाडाच्या घरांच्या किमतीही सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. दरम्यान, दिवाळीपूर्वी म्हाडाच्या एक हजार घरांसाठी लॉटरी निघणार असून यात घरांच्या किंमती किती असणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.