Balasaheb Thackeray and RSS : दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अडचण होत आहे. संघाच्या दादर शाखेने शिवाजी पार्क येथे शाखा भरवण्यासाठी वेगळा भूखंड देण्याची मागणी महापालिकेकडे केली आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे स्मृतीस्थळ असलेल्या ठिकाणी संघाची शाखा भरत होती. मात्र, स्मृतीस्थळाच्या वाढत्या व्याप्तीमुळे संघाला शाखा भरवणे अशक्य होत असल्याचा दावा संघाच्या दादर शाखेने केला आहे. 


राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मुंबई महापालिकेला लिहिलेल्या पत्रानुसार, शिवाजी पार्क मैदानातील मोकळ्या भूखंडावर 1936 पासून संघाची शाखा भरवली जात होती. त्यानंतर 1967 मध्ये संघाने या भूखंडाचे नियमितपणे भाडे भरले आहे. संघाने या भूखंडासाठी असलेले भाडे 2007 पर्यंत भरले आहे. मात्र, त्यानंतर महापालिकेने जमिनीचे आरेखन न केल्याने 2008 पासूनचे भाडे थकले आहे. आरेखन करण्याची मागणी वांरवार करूनही महापालिकेने आरेखन केले नाही. त्यामुळे भाडे थकले असल्याचे संघाच्या पत्रात नमूद करण्यात आले आहे. हा भूखंड 1755 चौरस मीटर एवढ्या क्षेत्रफळाचा आहे. संघाने दावा केलेल्या भूखंडाला लागून बाळासाहेबांचे स्मृतीस्थळ आहे. 






संघाची शाखा भरत असलेल्या भूखंडावर बाळासाहेब ठाकरे यांचे स्मृतीस्थळ उभारण्यात आले आहे. त्यामुळे संघाला उपक्रम राबण्यास अडचण येत आहे. मुंबई महापालिकेने थकित भाडे स्वीकारावे आणि आरेखन पूर्ण करावे अशी मागणी संघाने केली आहे. पर्याय म्हणून शिवाजी पार्क येथील नाना-नानी पार्कजवळील मोकळा भूखंड द्यावा अशी मागणीदेखील संघाने केली आहे. 


दरम्यान, स्थानिकांकडून शिवाजी पार्क हे खेळासाठीच मैदान हवे, त्यावर इतर कोणतेही उपक्रम नसावे अशी मागणी करण्यात येत आहे. तर, दुसऱ्या बाजूला आता संघाच्या या पत्रावर शिवसेनेकडून कोणती प्रतिक्रिया उमटते यावर अनेकांचे लक्ष लागले आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या: