मुंबई : शीना बोरा हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी इंद्राणी मुखर्जीला तिचे पती पीटर मुखर्जी यांनी प्रेमपत्र लिहिल्याचं समोर आलं आहे. 3 जानेवारीला झालेल्या वाढदिवशी पीटर मुखर्जींनी एकपानी पत्रातून हे दुःस्वप्न लवकर संपावं अशी आशा व्यक्त केली होती.


 
या पत्रात पीटर यांनी स्वतःची तुलना रोमियोशी आणि पत्नी इंद्राणीचा उल्लेख ज्युलिएट असा केल्याचं 'फर्स्टपोस्ट'ने म्हटलं आहे.

 

'मुमू, माय डियरेस्ट, आज तुझ्या आयुष्यातला, पर्यायाने माझ्याही आयुष्यातला खास दिवस. आपल्या दोघांच्या भेटीनंतर आजतागायत तुझ्या बर्थडेला आपण कायम एकत्र राहिलो आहोत. मात्र इतक्या वर्षांत आपण पहिल्यांदाच इतके जवळ असूनही इतके लांब आहोत'


 

पत्राच्या खाली पीटर मुखर्जी यांनी किसेस आणि हग्स (आलिंगन)  लिहिल्याचं 'मिड डे' ने म्हटलं आहे.

 

इंद्राणी या प्रकरणातून सहीसलामत सुटावी आणि हा वाईट काळ संपून सुखाचे दिवस यावेत, यासाठी प्रार्थना करत असल्याचं पीटर यांनी लिहिलं आहे. देव दयाळू आहे. याचा शेवट नक्की होईल, आपण रोमियो-ज्युलिएटप्रमाणे एकमेकांना लवकरच पाहू शकू, कोर्टात किंवा घरी, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली आहे.

 
एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार हे पत्र लिहिण्याच्या आदल्याच दिवशी पीटर यांच्या वकिलाने पहिल्यांदा जामिनासाठी अर्ज केला होता. विशेष म्हणजे, या अर्जात शीनाच्या हत्येला एकटी इंद्राणी जबाबदार असून तिने पीटर यांना फसवल्याचं म्हटलं होतं.

 
दुसऱ्या जामीन अर्जात इंद्राणी ही अत्यंत महत्त्वाकांक्षी स्त्री असून तिच्या इच्छा आणि आकांक्षा पूर्ण करण्यासाठी मुलांचा त्याग करण्यासही तयार असल्याचं पीटर यांनी म्हटल्याचं 'डेक्कन क्रॉनिकल्स'ने म्हटलं आहे.