मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसा राजकीय घडामोडींना वेग येत आहे. विविध पक्षांचे दिग्गज नेते एकमेकांच्या भेटीगाठी घेत असतानाच दोन पक्षांमधले युवा चेहरेही एकत्र येताना दिसत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे आणि शरद पवारांचे नातू रोहित पवार यांची मुंबईत भेट झाली. एकीकडे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे वाढदिवशी कोणासोबत 'डिनर डेट' करणार, याची चर्चा रंगलेली असताना अमित आणि रोहित यांची 'लंच भेट' झाली.


लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी आणि मनसेचं जमलेलं गूळपीठ आपल्यासाठी नवीन नाही. राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित खासदार अमोल कोल्हे यांनी राज ठाकरे यांची घेतलेली भेट ताजी असतानाच अमित ठाकरे आणि रोहित पवार एकमेकांना भेटले. मुंबईतील फिनिक्स मिल कंपाऊंड मधील इंडिगो हॉटेलमध्ये दोघांनी एकत्र जेवण घेतलं.

विशेष म्हणजे आजच सकाळी रोहित पवार यांनी फोन करुन भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. अमित ठाकरेंनी तात्काळ होकार दिल्यामुळे दुपारी दीड वाजताच्या सुमारास अमित आणि रोहित यांची भेट झाली. दोघांमध्ये जवळपास सव्वा तास गप्पा रंगल्या.

VIDEO | रोहित पवारसोबत कुठलंही वैर नाही, त्यांच्यासोबत मैत्रीपूर्ण संबंध : सुजय विखे



ही सदिच्छा भेट असल्याचं सांगितलं जात असलं, तरी विधानसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेले असताना राजकारणापासून दूर असलेले, मात्र महाराष्ट्राच्या राजकारणातील दोन मोठ्या घराण्यांमधले तरुण चेहरे एकमेकांना भेटत असल्यामुळे ही नव्या समीकरणांची नांदी आहे का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

लोकसभा निवडणुकीला मनसेला राष्ट्रवादीसोबत आघाडीमध्ये सहभागी होण्याची इच्छा होती, असं म्हटलं जातं. काँग्रेसने खोडा घातल्यामुळे हे समीकरण बिघडलं असलं, तरी राज ठाकरेंनी सभा घेत आघाडीला अप्रत्यक्ष मदत केली होती. आता विधानसभेला काँग्रेसने वेगळा मार्ग निवडला , तर राष्ट्रवादीला मनसे हात देऊ शकते. यासाठीच सर्व स्तरावर जुळवाजुळव सुरु असल्याचं दिसत आहे.

रोहित पवार हे सध्या पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत. बारामती अॅग्रो लिमिटेडचे ते सीईओ असून भारतीय साखर कारखान्यांच्या असोसिएशन (इस्मा)चे ते अध्यक्ष आहेत. रोहित हे राजेंद्र पवारांचे पुत्र, म्हणजेच शरद पवारांचे नातू, तर माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पुतणे.