मुंबई : मंत्रिमंडळात नंबर दोनचे मंत्री समजले जाणारे चंद्रकांत पाटील यांना प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यावर पक्षात विचार सुरू आहे. मात्र महत्वाची खाती आणि शेतकरी कर्जमाफी, मराठा आरक्षण सारख्या महत्वाच्या उपसमितीचं अध्यक्ष पद सोडून ऐन निवडणुकीच्या तोंडावर संघटनात्मक जबाबदारी स्वीकारण्यास चंद्रकांत पाटील अनुकूल नाहीत, अशी माहिती मिळाली आहे.


यामुळे भाजप प्रदेशाध्यक्ष पदासाठी पक्षश्रेष्ठींकडून विचारणा झाली असली तरी चंद्रकांत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष पदासाठी नकार दिल्याची माहिती भाजपच्या सूत्रांनी दिली आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना केंद्रात मंत्रीपद मिळाल्याने महाराष्ट्रात भाजपचे प्रदेशाध्यक्षपद कुणाला मिळणार यावर आता चर्चा होऊ लागली आहे.

भाजपच्या पहिल्या फळीतील चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन आणि पंकजा मुंडे यांची नावं पुढे आली होती. यामध्ये चंद्रकांत पाटील यांच्या नावावर पक्षश्रेष्ठींचं एकमत झालं असल्याची माहिती आहे.

भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना नरेंद्र मोदी सरकारमध्ये मंत्रीपद दिले आहे.  जालना लोकसभा मतदार संघातून दानवे सलग पाचव्यांदा खासदार झाले आहेत.  दानवेंना केंद्रीय मंत्रीपद मिळाल्यानंतर ते प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देतील, त्यामुळेच रिक्त झालेल्या प्रदेशाध्यपदावर कोणाची वर्णी लागणार याबाबतही भाजप नेत्यांमध्ये चर्चा सुरु आहे.

2014 साली एनडीएचे सरकार आल्यानंतर दानवे यांना मोदी सरकारमध्ये ग्राहक संरक्षण खात्याचे मंत्रीपद दिले होते. परंतु अवघ्या दीड वर्षात दानवे यांना महाराष्ट्रात धाडण्यात आले होते आणि त्यांच्यावर भाजप प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती.