BMC vs MSRDC Toll Issue : मुंबई पश्चिम - पूर्व द्रुतगतीमार्गावरचे टोल बंद करण्याची मागणी शिवसेना नेते युवा सेना अध्यक्ष आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray ) यांनी केली आहे. मुंबईतील रस्त्याची दुरुस्ती आणि देखभाल मुंबई पालिकेकडे, मग टोलचे पैसे एमएसआरडीसी (MSRDC) कडे का, असा सवाल शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. एमएमआरडीएने (MMRDA) मुंबई महानगरपालिकेला वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे (WEH) आणि इस्टर्न एक्स्प्रेस हायवे (EEH) मेंटन्सनसाठी दिले आहेत. मग तिथे टोल वसुली का केली जाते? हा टोल एमएसआरडीसी का घेत आहे? जर हे दोन महत्वाचे रस्ते बीएमसीकडे हस्तांतरित केले आहेत तर, मग टोलचे पैसे एमएसआरडीसीकडे का जात आहेत? असे विविध सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केले आहेत.


रस्त्यांच्या दुरवस्थेवरून बीएमसी नेहमीच टार्गेट


रस्त्यांवरील खड्ड्यांवरून बीएमसीला नेहमीच टार्गेट केले जातं. पावसाळ्यात मुंबईतील रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे होणाऱ्या अपघातांमुळे बीएमसीला जनतेच्या रोषाला सामोरे जावं लागतं. मुंबईतील रस्त्याची दुरुस्ती आणि देखभालीचं काम आधी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ म्हणजेच MSRDC (Maharashtra State Road Development Corporation) कडे होतं. पण, ते योग्यरित्या होत नसल्याने शिंदे-फडणवीस सरकार आल्यावर हे काम मुंबई पालिकेकडे सोपवण्यात आलं. पालिकेकडे काम असताना या रस्त्यांवरील टोल मात्र MSRDC घेत असल्यामुळे हे टोल बंद करण्याची मागणी आदित्य ठाकरे यांनी केली आहे.


'रस्त्यावरील जाहिरातीचा रेव्हेन्यू बीएमसीला द्यावा'


आपण मुंबई पालिकेकडे दोन मागण्या केल्याचं आदित्य ठाकरे यांनी सांगितलं आहे. त्यांनी सांगितलं की, मी दोन मागण्या बीएमसी प्रशासनाला केल्या आहेत. एक तर वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे (WEH) आणि इस्टर्न एक्स्प्रेस हायवे (EEH) या दोन्ही रस्त्यावरील टोल नाके बंद करावेत आणि वन टाइम सेटलमेंट करावेत. या रस्त्यावरील जाहिरातीचा रेव्हेन्यू बीएमसीला देण्यात यावा, एमएसआरडीसीने घेऊ नये. नोव्हेंबरमध्ये हे दोन रस्ते बीएमसीकडे मेंटनन्ससाठी हस्तांतरित केले आहेत. 


पश्चिम - पूर्व द्रुतगतीमार्गावरचे टोल बंद करण्याची आदित्य ठाकरेंची मागणी


दरम्यान, 'टोल नाक्यावर आंदोलन केले तर टोल वाल्यांचा नुकसान होईल. वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागेल. त्यामुळे आंदोलन करणार नाही. या मागण्यासाठी आम्ही आंदोलन करणार नाही. आमचं सरकार लवकरच येईल, तेव्हा आम्ही हे टोल बंद करू. सरकार पडयाची वेळ जवळ आली आहे', असंही आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. खोके सरकारला किती पैसा जातो माहीत नाही, त्यांची वसुली सुरू आहे. आम्ही जनेतचा विचार करतो, ते खोक्यांचा विचार करतात. मुख्यमंत्र्यांना राजकीय कार्यक्रमाला वेळ आहे. पण बेस्टसाठी आणि मुंबईकरांसाठी वेळ का नाही, असा सवाल त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारला आहे.


'बेस्टसाठी मुख्यमंत्र्यांनी काही केलं नाही'


बेस्टचे काय हाल सुरू आहेत, आपण बघत आहोत. मुख्यमंत्र्यांकडून दिल्लीच्या वाऱ्या सुरू आहेत. बेस्टसाठी मुख्यमंत्र्यांनी काही केलं नाही. साधं ट्वीट सुद्धा केलं नाही. त्यांच्या अंतर्गत बैठका झाल्या की नाही माहीत नाही. सरकारची डेडलाईन जवळ यायला लागली आहे. घोटाळ्यांवर घोटाळे सुरू आहेत. आमचं सरकार आल्यावर चौकशी करणार आणि दोषींना तुरुंगात टाकलं जाईल.