मुंबई : शिक्षण हक्क अधिनियमानुसार (Right To Education) शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी 25 टक्के आरक्षित जागांसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.  सोडतीची निवड आणि प्रतीक्षा यादी शनिवारी, 20 जुलै रोजी  संकेतस्थळावर प्रसिद्ध होणार आहे. तर 23 जुलैपासून प्रवेश प्रक्रिया होणार सुरू होणार आहे. 


शिक्षण हक्क अधिनियमानुसार बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 (RTE) नुसार दरवर्षी 25 टक्के प्रवेश प्रक्रिया संपूर्ण राज्यात ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येते. त्यानुसार सन 2024-25 या शैक्षणिक वर्षासाठी खासगी प्राथमिक शाळांमधील 25 टक्के आरक्षित जागांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. 


उच्च न्यायालय मुंबई यांनी जनहित याचिका आणि रिट याचिकेवर आज (दिनांक 19 जुलै 2024) रोजी अंतिम निर्णय दिला आहे. सन 2024-25 या शैक्षणिक वर्षाच्या शिक्षण हक्क अधिनियमानुसार दुर्बल व वंचित घटकाकरिता 25 टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची दिनांक 7 जून 2024 रोजी काढण्यात आलेल्या सोडतीची निवड यादी व प्रतिक्षा यादी शनिवारी, दिनांक 20 जुलै रोजी https://student.maharashtra.gov.in/adm_portal या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे.


पालकांना येणार नोंदणीकृत संदेश


या सोडतीद्वारे शाळेमध्ये प्रवेशासाठी निवड झालेल्या बालकांच्या पालकांना त्यांनी नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावर सोमवार (दिनांक 22 जुलै 2024 पासून मेसेज (SMS) येण्यास सुरुवात होईल.


असा घ्या प्रवेश


प्रवेश मिळाल्याचा मेसेज प्राप्त झालेल्या पालकांनी दिनांक 23 जुलै ते 31 जुलै पर्यंत आपल्या जिल्ह्यातील संबंधित तालुकास्तरावरील पडताळणी समितीकडे कागदपत्रांची पडताळणी करुन पडताळणी समितीमार्फत आपल्या बालकांचा प्रवेश निश्चित करुन घ्यावा असे आवाहन शिक्षणाधिकारी (प्राथमिक) राजेश कंकाळ, शिक्षणाधिकारी (माध्यमिक व खासगी प्राथमिक शाळा विभाग) राजू तडवी यांनी केले आहे. 


बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील एकूण 338 पात्र शाळांमध्ये एकूण 6 हजार 265 जागांवर एकूण 9 हजार 902 अर्ज प्राप्त झाले आहेत. 


ही बातमी वाचा: