मुंबई : राज्यभरातील निवासी डॉक्टरांकडून (Resident Doctor) पुन्हा राज्यव्यापी संपाची (Strike) हाक देण्यात आली असून, आजपासून हे डॉक्टर संपावर जात आहेत. आपल्या प्रलंबित मागण्या पूर्ण होत नसल्याने आज (22 फेब्रुवारी) रोजी संध्याकाळी 5 वाजेपासून राज्यभरातील निवासी डॉक्टर संपावर जाणार आहे. यापूर्वी देखील 7 फेब्रुवारीला संपावर जाण्याचा निर्णय निवासी डॉक्टरांकडून घेण्यात आला होता. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवारांसोबत (Ajit Pawar) झालेल्या बैठकीनंतर संप स्थगित करण्यात आला होता. मात्र, आश्वासन देऊनही मागण्या पूर्ण होत नसल्याने आजपासून राज्यभरातील निवासी डॉक्टर संपावर जाणार आहेत.
निवासी डॉक्टरांच्या प्रमुख मागण्या...
- निवासी डॉक्टरांना दिले जाणारे विद्यावेतन हे प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेपर्यंत त्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावे.
- निवासी डॉक्टरांसाठी पुरेशा प्रमाणात हॉस्टेलची व्यवस्था करण्यात यावी.
- निवासी डॉक्टरांना दिले जाणारे विद्यावेतन ही केंद्रीय संस्थांमध्ये दिल्या जाणाऱ्या विद्यावेतनाप्रमाणे देण्यात यावे.
मागच्या वेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि सेंट्रल 'मार्ड'ची वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ साहेब, सेक्रेटरी मेडिकल एज्युकेशन, कमिशनर डीएमईआर डायरेक्टर डीएमईआर, जॉइंट सेक्रेटरी फायनान्स डिपार्टमेंट यांच्यासोबत संयुक्त बैठक पार पडली होती. या बैठकीमध्ये मंत्री हसन मुश्रीफ यांनी महाराष्ट्रातील निवासी डॉक्टरांच्या समस्या समजून घेतल्या व 'मार्ड'च्या तीनही मागण्या अगदी बरोबर असून, त्या लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, फक्त आश्वासनच मिळाल्याने निवासी डॉक्टर संपावर ठाम होते. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर संप स्थगित करण्यात आला होता
अजित पवारांनी दिले होते 'हे' आश्वासन...
अजित पवारांसोबत झालेल्या बैठकीत, राज्यातील निवासी डॉक्टरांचे वेतन वेळेत मिळत नसल्याने 10 तारखेच्या आत पगार तसेच विद्या वेतनमध्ये 10 हजार रुपये वाढ करण्यासाठी येणाऱ्या मंत्रिमंडळ बैठक घेण्यात येईल, निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनात 10 हजार रुपयांची भरीव वाढ करण्यासह ठराविक तारखेला नियमित विद्यावेतन, वसतिगृहांची तातडीने दुरुस्ती करणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले होते. मात्र, याबाबत कोणताही निर्णय होत नसल्याने निवासी डॉक्टरांनी आज सायंकाळी पाच वाजल्यापासून अनिश्चित काळासाठी राज्यव्यापी संप पुकारला आहे. त्यामुळे याचे थेट परिणाम राज्यभरातील आरोग्य यंत्रणेवर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता यावर सरकार कोणता तोडगा काढणार हे पाहणं महत्वाचे असणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :