मुंबई : रिझर्व्ह बँकेने यंदाच्या वर्षातील पहिलं तिमाही पतधोरण जाहीर केलं आहे. सलग दुसऱ्यांदा रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये कपात केला आहे. रेपो रेटमध्ये 0.25 टक्क्यांनी कपात करण्यात आली आहे. आता नवीन 6.25 टक्क्यांवरुन 6 टक्के झाला आहे.
रेपो रेटमध्ये कपात झाल्याने कर्जावरील व्याज कमी होऊन, कर्जदारांचा मासिक हफ्ता काहीसा कमी होणार आहे. तसेच ऑटो लोन आणि पर्सनल लोनही स्वस्त होणार आहे. रिव्हर्स रेपो रेट आता 5.75 टक्के असणार आहे. आर्थिक वर्ष 2020 मध्ये विकासदर 7.2 टक्के राहील असा अंदाज देखील वर्तवण्यात आला आहे.
फेब्रुवारीमध्ये रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये 0.25 टक्क्यांनी कपात करत रेपो रेट 6.25 टक्क्यांवर आणला होता. आजच्या कपातीनंतर रेपो रेटमध्ये गेल्या तीन महिन्यात 0.5 टक्क्यांनी कपात करण्यात आली आहे.
रेपो रेट म्हणजे काय?
रेपो रेट म्हणजे ज्या दराने बँका रिझर्व बँकेकडून पैसे घेते तो दर. रेपो रेट वाढणं म्हणजे बँकांना रिझर्व बँकेकडून मिळणाऱ्या कर्जदरात वाढ होणं, तर रेपो रेट कमी होणं म्हणजे बँकेला स्वस्तात पैसे मिळणं.म्हणजेच आरबीआयने रेपो रेट वाढवला तर पर्यायाने सर्व बँकांना ग्रहकांना द्यावयाची कर्जाचे दरही वाढवावे लागतात. तर कमी झाल्याने व्याज दर कमी होतो.
कोणाला मिळणार फायदा?
ज्यांचं होम लोन किंवा ऑटो लोन सुरु आहे, त्या सर्वांना रेपो रेटमध्ये कपात झाल्याचा फायदा मिळणार आहे. रेपो रेटमध्ये कपात झाल्याने होम लोन आणि ऑटो लोनवरील व्याजदर कमी होणार आहे. त्यामुळे लोनचा हप्ता आपोआप कमी होणार आहे.