मुंबई : मुंबईकरांना कमी अंतराच्या प्रवासासाठी एक नवा पर्याय उपलब्ध झाला आहे. मुंबईकरांनी सायकलकडे वळावे, यासाठी मुंबई वन मेट्रोने भन्नाट आयडिया राबवण्याचा निर्णय घेतला आहे. वर्सोवा-घाटकोपर मेट्रोने प्रवास करणाऱ्या मेट्रोच्या प्रवाशांना जागृतीनगर मेट्रो स्टेशनच्या बाहेर दोन रुपये अशा स्वस्त दरात भाड्याने सायकल उपलब्ध होणार आहे. आज या सायकल योजनेचा शुभारंभ होणार झाला. जागृतीनगर मेट्रो स्टेशनवर दर तासाला फक्त दोन रुपये वाजवी दरात इच्छुक प्रवाशांना भाड्याने सायकली मिळतील.


भविष्यात मुंबई मेट्रो वन इतर स्थानकांवरही सायकली भाड्याने देण्याच्या पर्यायाचा एमएमआरडीए विचार करेल. तसेच एमएमआरडीए अंतर्गत येणाऱ्या मेट्रो प्रकल्पांसाठी वेगळे सायकल ट्रॅकही देण्यात येतील. मेट्रोचे प्रवासी मायबीक अ‍ॅपचा वापर करून, या सेवेचा लाभ घेऊ शकतात.


सध्या मुंबईत प्रवासासाठी सायकलींचा वापर फारच सुरुवातीच्या टप्प्यात आहे. या पर्यावरणपूरक वाहतुकीच्या सायकल वापराला प्रोत्साहन देण्यासाठी मुंबई मेट्रो वनसुद्धा या प्रयत्नात सामील झाली आहे, अशी प्रतिक्रिया एमएमआरडीए आयुक्त आर. ए राजीव यांनी दिली आहे. प्रवास करण्याव्यतिरिक्त आपल्या लोकप्रिय शॉपिंगच्या ठिकाणी भेट देण्यासाठी सायकल प्रवास हा पर्याय ठरु शकणार आहे. मुंबई मेट्रो वनने मायबायक कंपनीबरोबर शेवटच्या मैलावरील कनेक्टिव्हिटीसाठी भाड्याने सायकली पुरवण्यासाठी करार केला आहे.