मुंबई : धोबी आणि परीट समाज्याला अनुसूचित जातींमध्ये समाविष्ट न करण्यासाठी मंत्रालयातील काही शासकीय अधिकाऱ्यांनी आणि काही माजी मंत्र्यांनी प्रयत्न केला होता. मात्र, तो प्रयत्न भाजप सरकारने हाणून पाडल्याचा गौप्यस्फोट माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. ते आझाद मैदान येथे श्री संत गाडगे महाराज जयंती समारोह कार्यक्रमात बोलत होते. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर उपस्थित होते.

आझाद मैदान येथे राष्ट्रीय रजक महासंघाच्या वतीने श्री संत गाडगे महाराज जयंती समारोह तथा समाज बांधव संमेलन 2020 चं आयोजन करण्यात आले होते. या संमेलनाच्या समारोपा प्रसंगी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, आम्ही सगळे गाडगेबाबा यांच्या विचारावर काम करणारी माणसे आहोत. पंतप्रधान यांनी स्वच्छ भारत अभियान सुरू केले, मात्र याचे उगम स्थान हे गाडगे बाबा आहेत. गाडगेबाबा यांच्या विचारावर देशाचे सरकार चालत आहे. धोबी-परीट समाजावर अन्याय झालेला आहे. अनुसूचित जातींमधून त्यांना वंचित ठेवण्यात आलं आहे.

आतापर्यंतचं हे सर्वात गोंधळलेलं सरकार : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस

20 वर्षांपासून धोबी समाजाचे आंदोलन सुरू -
अनुसूचित जातींमध्ये समावेश व्हावा यासाठी गेल्या 20 वर्षांपासून आंदोलन सुरू आहे. बार्टीचा अहवाल तयार झाला, तो चुकीच्या पद्धतीने तयार करण्यात आला. धोबी परीट समाज्याला अनुसूचित जातींमध्ये समाविष्ट केलं जाऊ नये यासाठी मंत्रालयातील काही उच्चस्तरीय अधिकारी आणि माजी मंत्र्यांनी प्रयत्न सुरू केले होते. मात्र, त्यांचे प्रयत्न भारतीय जनता पक्षाच्या सरकारने हाणून पाडले आहेत. आम्ही भांडे समितीचा अहवाल लागू करण्याचे प्रयत्न केले. हा अहवाल आम्ही केंद्राला पाठवला आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

समाज सुधारक आणि राष्ट्रसंत गाडगे बाबा यांच्या 144व्या जयंतीनिमित्त आझाद मैदानावर राष्ट्रीय रजक महासंघ भारतच्या(धोबी/परीट - सर्व भाषिक )वतीने एका भव्य कार्यक्रमाचे आयोजन केलं होतं. या कार्यक्रमाला देशातील जवळपास 11 राज्यातून रजक समाजातील लोक आले होते.

Dhangar Reservation |आरक्षणाच्या मागणीसाठी 26 फेब्रुवारीला धनगर समाजाचं ‘सुंबराण’ आंदोलन | ABP Majha