कल्याण : एका महिलेच्या पोटातून तब्बल साडेसहा किलो वजनाचा गोळा काढला आहे. कल्याणच्या एका खासगी रुग्णालयात ही शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रिया करण्यात आलेली महिला ही कल्याणची रहिवासी आहे.


गेल्या एक महिन्यांपासून सदर महिलेच्या पोटात दुखत होतं. त्यामुळं तिने सोनोग्राफी आणि सिटी स्कॅन केलं असता तिच्या पोटात गर्भाशयाजवळ मोठा गोळा असल्याचं डॉक्टरांना निदर्शनास आलं.

त्यामुळं डॉक्टर राजेंद्र सोनावणे आणि डॉक्टर सुहास म्हैसकर यांनी तिच्यावर आज (बुधवारी) सकाळी तातडीनं शस्त्रक्रिया केली. यावेळी तिच्या पोटातून तब्बल साडेसहा किलो वजनाचा गोळा काढण्यात आला. इतक्या मोठ्या वजनाचा गोळा निघण्याची ही पहिलीच वेळ असून यानंतर या महिला रुग्णावर उपचार सुरू आहेत. या महिलेची प्रकृती आता उत्तम असल्याची माहिती डॉक्टर राजेंद्र सोनावणे यांनी दिली आहे.