मुंबई : भाजपचे माजी मंत्री एकनाथ खडसेंना मुंबई उच्च न्यायालयाकडून धक्का मिळाला आहे. राज्यभरात खडसे समर्थकांनी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्याविरोधात दाखल केलेल्या अब्रूनुकसानीच्या खटल्यांना स्थगिती दिली आहे. मुक्ताईनगर, रावेर, यावळ आणि शिरपूरमध्ये सुरु असलेल्या खटल्यांना हायकोर्टाच्या या आदेशामुळे स्थगिती मिळाली आहे.

32 पैकी 21 खटल्यांना बुधवारी हायकोर्टाने स्थगिती दिली. न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे यांच्यासमोर दमानिया यांनी दाखल केलेल्या याचिकेवर बुधवारी सुनावणी झाली.

राज्यभरात जळगाव, नाशिक, धुळे, बुलडाणा, जालना आणि नंदुरबार अशा सहा जिल्ह्यांमध्ये मिळून एकूण 32 अब्रूनुकसानीचे खटले अंजली दमानिया यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आले आहेत. यातील उर्वरित 11 प्रकरणांविरोधात स्वतंत्र याचिका दाखल करण्याचे निर्देशही हायकोर्टाने या सुनावणी दरम्यान याचिकाकर्त्यांना दिले आहेत.

अंजली दमानिया यांनी खडसेंनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप करत त्यांच्याविरोधात तक्रारी आणि याचिका दाखल केल्या होत्या. ज्यामुळे सध्या खडसेंसारख्या बड्या नेत्याला आज राजकीय वनवास भोगावा लागत आहे.