मुंबई : मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात आज पावसानं जोरदार हजेरी लावली. मुंबईत झालेल्या अतिवृष्टीचा वाहतुकीवर परिणाम झाल्याने मुंबईकरांना आपल्या नियोजित स्थळी पोहोचता आले नाही. तसेच अनेक विद्यार्थी मुंबई विद्यापीठाच्या विविध परीक्षेस पोहोचू शकले नाहीत, त्या विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा घेतली जाणार आहे.

मुंबई विद्यापीठाच्या एमएस्सी सत्र 2 आणि 4 च्या प्रात्यक्षिक परीक्षेस जे विद्यार्थी महाविद्यालयात पोहोचू शकले नाहीत, त्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा विद्यापीठ पुन्हा घेणार आहे. तसेच एमए समाजशास्त्र सत्र 3ची आज दुपारी घेण्यात येणारी लेखी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. या परीक्षेचे वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. मुंबई विद्यापीठाचे स्थानापन्न उपकुलसचिव विनोद माळाळे यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

शाळा-महाविद्यालयांनाही सुट्टी

मुंबईतील शाळा आणि महाविद्यालयांनाही पावसाची स्थिती पाहता आज सुट्टी देण्यात आली आहे. राज्याचे शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी याबाबत घोषणा केली. पाणी साचल्याने विद्यार्थी पावसात कुठेही अडकू नये, यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून शाळा-कॉलेजांना सुट्टी देण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई आणि उपनगरांमध्ये सकाळपासून जोरदार पाऊस पडत आहे. मुंबईत गेल्या 21 तासात 108 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. पुढच्या 24 तासातही मुंबईसह आजबाजूच्या परिसरात जोरदार पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे मुंबईकरांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात येत आहे.

पावसामुळे मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेवरील लोकल वाहतूक जवळपास 15 ते 20 मिनिटं उशिराने सुरु आहे. त्यामुळे आठवड्याच्या पहिल्याच दिवशी ऑफिसला जाणाऱ्या नोकरदारांचे हाल होत आहेत. सध्या मुंबई उपनगरांसोबत ठाणे, डोंबिवली, नवी मुंबई याठिकाणी जोरदार पाऊस होत आहे.

संबधित बातम्या


मुंबईतील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी 


मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसराला पावसानं झोडपलं


इथे ना रस्ता आहे, ना कसली सुविधा, महाराष्ट्रातलं धक्कादायक वास्तव