LIVE UPDATE
मध्य आणि हार्बर मार्गावर ट्रॅकवरील पाण्याचा निचरा, वाहतूक सुरु पण उशिराने
नालासोपारा-विरार डाऊन आणि नालासोपारा-विरार अप मार्गावरील वाहतूक पूर्ववत
ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर वाहनांच्या लांबच्या लांब रांगा
मुंबई : ट्रान्स हार्बर मार्गावरील तुर्भे स्टेशनवर तांत्रिक बिघाड, पेंटाग्राफमध्ये बिघाड झाल्याने ठाण्याहून वाशीला जाणारी सेवा विस्कळीत
मुंबई विद्यापीठाच्या एमएस्सी सत्र 2 आणि 4 च्या प्रात्यक्षिक परीक्षेला जे विद्यार्थी महाविद्यालयात पोहोचू शकले नाहीत त्यांची परीक्षा पुन्हा होणार, तर एमए समाजशास्त्र सत्र 3 ची दुपारची लेखी परीक्षा पुढे ढकलली. याचं वेळापत्रक लवकरच जाहीर होईल
मध्य रेल्वेच्या माटुंगा रेल्वे स्थानकात सीएसएमटीकडे जाणाऱ्या जलद मार्गावर तांत्रिक बिघाड, लोकल खोळंबल्या
वसईच्या मिठागर भागात रेस्क्यू ऑपरेशन सुरु, एबीपी माझाच्या बातमीनंतर प्रशासनाची दखल
सँडहर्स्ट रेल्वे ट्रॅकवरील कोसळलेल्या भिंतीचा ढिगारा हटवला, धीम्या मार्गावरील वाहतूक सुरु, महापालिका, रेल्वे, म्हाडाचे अधिकारी घटनास्थळी दाखल
पावसाची स्थिती पाहता, मुंबईतील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी, शालेय शिक्षणमंत्री तावडे यांची घोषणा
लोकल ट्रेन अपडेट (10.51 am)
- मुंब्रा, कळवा, ठाणे इथे पाणी साचल्याने मध्य रेल्वेची वाहतूक अर्ध्या तास उशिराने
- नालासोपारा इथे ट्रॅकवर पाणी साचल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूकही अर्धा तास उशिराने, नालासोपाराच्या आधी एक्स्प्रेस गाड्या खोळंबल्या
- सँडहर्स्ट रेल्वे स्टेशनच्या ट्रॅकवर भिंत कोसळली, धीमी वाहतूक जलद मार्गावरुन वळवली
- हार्बर मार्गावर पाणी साचलेलं नाही, परंतु वाहतूक 20 मिनिटं उशिराने
कळव्यातील शाळेत नाल्याचं पाणी शिरलं
ठाणे : कळव्यातील सह्याद्री शाळेत नाल्याचं पाणी शिरलं. दत्तवाडी आणि शाळेचा परिसर जलमय झाला आहे. मुसळधार पावसामुळे या ठिकाणी असलेल्या नाल्याचं पाणी बाहेर आल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे. परिणामी कळवा नाक्यावरुन खारेगावपर्यंची दोन्ही दिशेची वाहतूक काही प्रमाणात मंदावली आहे.
रायगड : जुन्या मुबंई-पुणे हायवेवर झाड पडल्याने वाहतूक विस्कळीत, खोपोलीजवळ झाड पडल्याने दोन्ही दिशेकडील वाहतूक बंद
मुंबई : लोकल ट्रेनच्या हार्बर मार्गावरील सँडहर्स्ट स्टेशनच्या स्लो ट्रॅकवर भिंत कोसळली, धीमी वाहतूक जलद मार्गावरुन वळवली
वसई - वसई पूर्वेकडील मिठागरात पाणी, 400 लोक अडकल्याची माहिती, प्रशासनाचे कोणतेच अधिकारी इथे पोहोचलेले नाहीत
वसई- विरार परिसरात जोरदार पाऊस, रात्रभर पावसाची संततधार, अनेक सखल भागात पाणी साचले
वसई- विरार परिसरात जोरदार पाऊस कोसळत आहे. रात्रभर पावसाची संततधार सुरु असल्याने अनेक सखल भागात पाणी साचले आहे. वसईचा नवघर डेपो, सनटी रोड पाण्याखाली गेला आहे. तर नालासोपारातील आचोळे, तुलीज, टाकी रोड, नालासोपारा स्टेशन परिसर जलमय झाला आहे. तर विरारच्या विवा कॉलेज परिसरातही पाणी साचले आहे.
कोकणात मुसळधार
कुडाळमधल्या कर्ली नदीनं धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे 27 गावांचा संपर्क तुटला आहे. त्यातही आंबोली, मांगेली, सावडाव आणि नापणे अशा धबधब्यांवर पर्यटकांनी गर्दी केली. सध्या पावसाचा जोर वाढत असल्यानं पर्यटकांनी काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.
मराठवाड्यात अतिवृष्टीचा इशारा
मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात उद्या अतिवृष्टी होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. काल औरंगाबादेत काही तास पाऊस झाला. गेल्या आठवडाभरापासून कोकणासह विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राला पावसाने चांगलंच झोडपून काढलं. मात्र मराठवाड्यात पाऊस नसल्यामुळे पेरण्या खोळंबल्या होत्या. मात्र आता हवामान विभागाच्या अंदाजानं बळीराजा चांगलाच सुखावला आहे.
कृष्णेच्या बंधाऱ्यावरुन पाणी
पावसाच्या जोरामुळे सांगलीतल्या कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. गेल्या चार दिवसांपासून सांगलीत पावसानं चांगलाच जोर धरला. कृष्णा नदीवरील बंधारा पाण्याखाली गेला असून बंधाऱ्यावरुन पाणी वाहू लागलं आहे. यामुळे प्रशासनाने जवळच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
रायगडात तरुण बुडाला
रायगडमध्ये तलावात तरुण बुडाल्याची घटना समोर आली आहे. उरण तालुक्यातील विनायक गावचा रहिवासी विराज पाटीलचा मृत्यू झाला. केगावमधील तलावात तीन ते चार मित्र पोहायला गेले असताना ही घटना घडली. स्थानिक गावकऱ्यांच्या सहाय्यानं विराजचा शोध सुरु आहे.