मुंबईः रिलायंस इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांच्याकडे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजे एमएमआरडीएची तब्बल 1577 कोटी रुपयांची थकबाकी असल्याची माहिती समोर आली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ता अनिल गलगली यांनी दाखल केलेल्या माहिती अधिकार अर्जात ही माहिती उघड झाली आहे.


 

रिलायन्स इंडस्ट्रीजकडून 1576 कोटी 90 लाख 72 हजार 840 एवढा अतिरिक्त प्रीमियम बाकी असल्याचा दावा गलगली यांनी केला आहे. त्यामुळे जिओ सिम मोफत देऊन 'डाटा'गिरीचा दावा करणाऱ्या अंबानींकडे कोट्यावधींची थकबाकी असल्याचं स्पष्ट झालं आहे.

 

गलगलींनी बीकेसीमधील सर्व लीजधारकांकडे असलेल्या थकबाकी रकमेची माहिती मागितली होती. त्यात ही माहिती समोर आल्याचा दावाही गलगलींनी केला. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एमएमआरडीएला पत्र लिहिलं असून ही रक्कम व्याजासहित एका महिन्यात वसूल करण्याची मागणी केली आहे.