मुंबई : "मी अभिमानाने सांगतो की महाराष्ट्र हे महत्वकांक्षी राज्य आहे", असं म्हणत रिलायन्स इंडस्ट्रिजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी मराठीतून भाषणाला सुरुवात केली. गेल्या काही वर्षात सर्वाधिक गुंतवणूक महाराष्ट्रातच केली असल्याचं मॅग्नेटिक महाराष्ट्रच्या कार्यक्रमात बोलताना मुकेश अंबानींनी सांगितलं.

मुंबईतील बीकेसीत सुरु असलेल्या मॅग्नेटिक महाराष्ट्र कार्यक्रमांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. या कार्यक्रमाला राज्यपाल सी. विद्यासागर राव, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, सुरेश प्रभू, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार, सुभाष देसाई, विनोद तावडे, उद्योजक रतन टाटा, मुकेश अंबानी यांच्यासह ग्लोबल बिझनेस लिडर्स मंचावर उपस्थित होते.

मुकेश अंबानी यांचं मराठीत भाषण

"मी अभिमानाने सांगतो की महाराष्ट्र हे महत्वकांक्षी राज्य आहे", असं म्हणत रिलायन्स इंडस्ट्रिजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी मराठीतून भाषणाला सुरुवात केली.

महाराष्ट्र माझी जन्मभूमी तर आहेच पण कर्मभूमीही आहे. रिलायन्सने गेल्या काही वर्षात 2 लाख 50 हजार कोटींच्या गुंतवणुकीपैकी सर्वाधिक गुंतवणूक महाराष्ट्रात केली आहे, अशी माहितीही मुकेश अंबानींनी दिली.

पंतप्रधान मोदींनी दूरदृष्टी ठेऊन कामं केली, पण सर्वात महत्वाचं म्हणजे लोकांचा दृष्टिकोन बदलण्याचं काम केलं. चीनने उत्पादनात जे यश मिळवलं त्यापेक्षा भारत पंतप्रधानांच्या नेतृत्वात अधिक यश मिळवू शकतो, असा दावाही मुकेश अंबानींनी केला.