मुंबई : मुंबईतील मान्सूनपूर्व कामासाठी निवडणूक आचारसंहिता शिथील करा, अशी मागणी मुंबई महापालिकेचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. दुष्काळग्रस्त भागासाठी आचारसंहिता शिथील करण्यासंबंधात राज्य सरकारनं केलेल्या मागणीच्या धर्तीवर मुंबईच्या महारौरांनी ही मागणी केली आहे.
सध्या मान्सूनपूर्व नालेसफाईची कामे रखडलेली आहेत. नवे धोरणात्मक निर्णय घेण्यास आचारसंहितेची अडचण आहे. तसेच मान्सूनपूर्व कामांसाठी आवश्यक असणारा पालिकेचा कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येनं निवडणूक कामाच्या प्रक्रियेत गुंतला होता. मान्सूनपूर्व किटकनाशक फवारणी आणि तपासणी ही कामे रेंगाळली आहेत. त्यामुळे यंदाचा पावसाळा मुंबईकरांसाठी खडतर ठरण्याची शक्यता आहे.
साथीच्या आजारांना आळा घालण्यासाठी काळजी घेण्याबाबत पालिकेकडून वर्षभर जनजागृती केली जाते. शिवाय फवारणी, डास-उत्पत्ती स्थाने नष्ट करण्याचे काम सुरु आधीच सुरु केली जातात. अस्वच्छता आणि पाणी साठून राहणार्या ठिकाणी डेंग्यू, मलेरियाचा प्रसार करणार्या डासांची उत्पत्ती होत असल्यामुळे ही ठिकाणे नष्ट केली जातात. मात्र पावसाळा काही दिवसांवर आला असला तरी ही कामे रखडली आहेत.