मुंबई : आतापर्यंत अनेकांनी सेल्फीच्या नादात जीव गमावल्याच्या घटना आपण पाहिल्या आहेत. कोणी पाण्यात बुडून जीव गमावला आहे, तर कोणी उंचावरून पडून मृत्यूमुखी पडला आहे. सेल्फीच्या मोहापायी अजून एका तरुणाने त्याचा जीव गमावला आहे. त्यासंदर्भातला एक व्हिडीओ मुंबई पोलिसानी ट्वीट करत जीवावर बेतेल असे साहस करु नका असे आवाहन केले आहे.


मुंबई पोलिसांनी ट्वीट केलेल्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे की, एक तरुण एका उंच इमारतीच्या गच्चीवर उभा आहे. इमारतीच्या गच्चीच्या कोपऱ्यावर उभा राहून तो सेल्फी घेण्याच्या प्रयत्नात आहे. अचानक त्याचा तोल जाऊन तो कित्येक फुट खाली कोसळतो.

व्हिडीओसोबतच्या कॅप्शनमध्ये मुंबई पोलिसांनी म्हटले आहे की, "सर्वात साहसी सेल्फी घेण्याचा प्रयत्न? कि एक बेजबाबदार पाऊल? हे जे काही केलंय, नक्कीच ते जोखीम घेण्याच्या लायक नव्हतं."


हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, हे अद्याप कळू शकले नाही. हा व्हिडीओ पाहून धडा घेत मुंबईकरांनी  जीवावर बेतेल असे कोणतेही धाडस करु नये, याबाबत जनजागृती करण्यासाठी हा व्हिडीओ शेअर केला असल्याचे बोलले जात आहे.