मुंबई : काँग्रेसनं स्वबळाचा सूर आवळला असला तरी राष्ट्रवादीनं शिवसेनेची हातमिळवणी कायम ठेवण्याचं जाहीर केलं आहे. मात्र त्याच राष्ट्रवादीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी झटका दिल्याच्या चर्चा सुरु आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. काही दिवसांपूर्वी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी परळमधील टाटा रुग्णालयातील 100 कॅन्सरग्रस्तांसाठी म्हाडाच्या खोल्या राखीव ठेवणार असल्याचा निर्णय जाहीर केला होता. परंतु, या निर्णयाला मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली आहे. 


गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या पुढाकारानंतर टाटा हॉस्पिटलमधील कॅन्सरग्रस्तांसाठी या म्हाडाच्या खोल्या राखीव ठेवण्यात आल्या होत्या. तसेच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या हस्ते या खोल्यांच्या चाव्यांचं वाटपही करण्यात आलं होतं. मात्र या विरोधात शिवसेना आमदार अजय चौधरी यांनी तक्रार केली होती. ज्या इमारतीमधील खोल्या कॅन्सरग्रस्तांसाठी राखीव ठेवण्यात आल्या होत्या, त्या इमारतीमधील रहिवाशांची तक्रार असल्याचं सांगत मुख्यमंत्र्यांनी या प्रस्तावाला स्थगिती दिली आहे. मात्र हा निर्णय घेण्यापूर्वी कोणत्याही राष्ट्रवादीच्या नेत्यांशी चर्चा केली नाही आणि परस्पर या निर्णयाला स्थगिती दिल्यानं आता महाविकास आघाडीत नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्याचंही पाहायला मिळत आहे. 


मुख्यमंत्र्यांनी कोणतीही चर्चा न करता राष्ट्रवादीनं घेतलेल्या एका मोठ्या निर्णयाला स्थगिती दिल्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीत मतमतांतरं आहेत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. लवकरच यासंदर्भातील खुलासा आणि एवढ्या मोठ्या निर्णयाला स्थगिती का देण्यात आली, याबाबतचं स्पष्टीकरण जाहीर केलं जाण्याची शक्यता आहे. 


काय होता खोल्या राखीव ठेवण्याचा निर्णय? 


संपूर्ण भारतातून परळ येथील टाटा मेमोरियल हॉस्पिटल येथे कॅन्सरबाधित रुग्ण उपचार घेण्यासाठी येत असतात. मात्र, अनेकवेळा येथे येणारे रुग्ण हे गरीब घरातून असल्याने रुग्णाला किंवा त्याच्या नातेवाईकांसाठी राहण्याच्या जागेचा प्रश्न निर्माण होत असतो. अनेक वेळा हे नातेवाईक हॉस्पिटलच्या आजुबाजूच्या परिसरात मिळेल त्या ठिकाणी, फूटपाथावर , पुलाखाली राहत असतात. त्याच्याबद्दलची कैफियत अनेकवेळा माध्यमांमधून मांडण्यात आली आहे. मात्र त्यानंतर काही सामाजिक संस्था तात्पुरती व्यवस्था करतात, परंतु  पुन्हा आहे, ती परिस्थिती निर्माण व्हायची. अखेर यावर कायम स्वरूपी तोडगा काढण्याचे कायम म्हाडाने केले असून त्यांनी टाटा रुग्णालयाजवळ असणाऱ्या इमारतीत 100 फ्लॅट देण्याचा निर्णय आज जाहीर केला होता. या निर्णयामुळे रुग्णांचे आणि नातेवाईकाचे हाल व्हायचे ते थांबणार असून रुग्णांसाठी हा मोठा दिलासा असल्याचं सांगण्यात आलं होतं.


राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी माहिती देताना सांगितले होते की, "म्हाडातर्फे टाटा रुग्णालयाजवळ असलेल्या इमारतीत 100 फ्लॅट रुग्ण आणि नातेवाईकांना राहण्यासाठी दिले आहेत. यापुढे त्या खोल्यांचे नियोजन कशा पद्धतीने असावे याचे सर्व अधिकार हे टाटा मेमोरियल हॉस्पिटल व्यवस्थापनाला असणार आहेत. यामध्ये शासन कुठलाही हस्तक्षेप करणार नाही. गेले अनेक वर्ष या रुग्णांची परवड होत होती. आज आम्ही हा निर्णय घेऊ शकलो याचे समाधान आहे. सगळ्यांनाच माहिती आहे की, येथे बाहेरगावावरून जे गरीब रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक येथे उपचार घेण्यासाठी येत असतात, त्यावेळी त्यांच्या रहाण्याच्या प्रश्नांवर खूप हाल होतात. त्यामुळे आजच्या या निर्णाणयामुळे काही प्रमाणात हा प्रश्न निकालात निघेल अशी आशा आहे."  


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


आरटीओ कथित भ्रष्टाचार प्रकरण : परिवहन मंत्री अनिल परबांना दिलासा, नाशकात असा गुन्हाच घडला नाही, पोलिसांची क्लिन चीट