राज्याचा अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी रेडी रेकनरच्या दराबाबत निर्णय होत असतो. येत्या 24 फेब्रुवारीपासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. त्याआधी रेडी रेकनरच्या दराबाबत चर्चा सुरु झाली आहे. रेडी रेकनरच्या दरात, विशेषत: मुंबईत कपात होण्याची शक्यता आहे. रेडी रेकनरच्या दरात कपात होते, तेव्हा घराचे दर कमी होतात. गेल्या अनेक वर्षांमध्ये मुंबईतील घरं महागली आहेत. परिणामी बरीचशा घरांची विक्री झालेली नाही. त्यामुळे यंदा पहिल्यांदाच रेडी रेकनरच्या दरात कपात चिन्हं आहेत. त्यामुळे मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
रेडी रेकनर म्हणजे काय?
मूल्य दर तक्ता म्हणजे इंग्लिश भाषेत रेडी रेकनर. स्थावर आणि जंगम मालमत्ता खरेदी करणाऱ्यांसाठी हा वापरात आणला जातो. मूल्य दर तक्त्यामध्ये बांधकाम वर्गीकरणासाठी आता जिल्हा, तालुका, गावानुसार स्वतंत्र दर निश्चित करण्यात येतात. मूल्य दर तक्त्यानुसार मालमत्तेचा बाजारभाव निश्चित होतो.
नोंदणी महानिरीक्षक तथा मुख्य नियंत्रक महसूल प्राधिकारी यांच्या मान्यतेनंतर वार्षिक मूल्य दर तक्ते अंतिम केले जातात. 2016 पासून वार्षिक मूल्य दर तक्ते आर्थिक वर्षानुसार म्हणजेच 1 एप्रिलपासून अंमलात येतात.