मुंबई : पीएमसी म्हणजे पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेचे सर्व व्यवहार आजपासून बंद करण्यात आले आहे. रिझर्व्ह बँकेने 35A अंतर्गत पीएमसी बँकेचे सर्व व्यवहार पुढील सहा महिन्यासाठी बंद करण्याचे आदेश दिले आहे. बँक डबघाईला आल्यामुळे पीएमसी बँकेचे पुढील व्यवहार सुरु ठेवण्यास आरबीआयने परवानगी नाकारली आहे. त्यामुळे राज्यभरातील चिंताग्रस्त ग्राहकांनी बँकांच्या बाहेर गर्दी केली आहे.


रिझर्व्ह बँकेच्या आदेशानंतर पीएमसी बँकेच्या खातेदारांना आता तीन महिन्यातून एकदा फक्त एक हजारापर्यंतच्या ठेवी काढता येणार आहेत,  अशी माहिती बॅंकेच्या अधिकाऱ्यांकडून मिळत आहे. आज अचानक सकाळपासून पीएमसी बँकेचे व्यवहार बंद झाल्याने ग्राहकांची चिंता वाढली आहे. अनेक ठिकाणी बँके बाहेर ग्राहकांचा गोंधळ पाहायला मिळत आहे.


पुढील 6 महिन्यात याबाबत योग्य तो मार्ग काढणार असल्याचं पीएमसी बँक व्यवस्थापनाकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. शिवाय ग्राहकांनी याबाबत काळजी करू नये, असंही पीएमसी बँकने ठेवीदारांना सांगितलं. बँकेचा एनपीए वाढणे, बँकेची गुंतवणूक धोक्यात येणे, वाढती बुडीत कर्ज ही पीएमसी बँक संकटात येण्याची मुख्य कारणे असल्याचं बँकिंग तज्ज्ञांचं मत आहे. पीएमसी बँकेला याआधीही रिझर्व्ह बँकेने नोटीस पाठवल्या होत्या. मात्र तरीसुद्धा बँकेचा अकार्यक्षम कारभारामुळे ही वेळ बँकेवर आल्याच बोललं जात आहे.



रिझर्व्ह बँकेच्या कारवाईमुळे बँकेला परवानगीशिवाय नवीन कर्ज देत येणार नाही, जुन्या कर्जांचे नूतनीकरण करता येणार नाही, कोणतीही गुंतवणूक करता येणार नाही, तसेच नव्या ठेवीही स्वीकारता येणार नाहीत, अशाप्रकारचे निर्बंध बँकेवर असणार आहेत.


बँकेच्या अशा अडचणीच्यावेळी रिझर्व्ह बँक राज्य शासनाच्या परवानगीने एक प्रशासक सहा महिन्यांसाठी येथे नेमते. बँकेला संकटातून बाहेर काढण्यासाठी मार्ग काढण्यासाठी प्रयत्न केले जातात. बँकेची स्थिती सहा महिन्यात सुधारली की पुन्हा वाढीव तीन महिन्याची मुदत बँकेला दिली जाते.


कोल्हापुरातही पीएमसी बँकेत ग्राहकांचा गोंधळ


कोल्हापुरातही पीएमसी बँकेत ग्राहकांचा प्रचंड गोंधळ पाहायल मिळत आहे.ग्राहकांना पैसे मिळत नसल्याने ते बँकेच्या अधिकाऱ्यांना विचारला करत आहेत. ग्राहकांचा गोंधळ पाहून बँकेचे दरवाजे बंद करण्यात आले आहेत. ग्राहक पोलिसांकडे तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात दाखल झाले आहे.


डोंबिवलीत ग्राहकांचा बँकेत घुसण्याचा प्रयत्न


डोंबिवलीच्या पीएमसी बँकेबाहेर प्रचंड गर्दी करत बँकेत घुसण्याच प्रयत्न केला. जवळपास दीड ते दोन हजार खातेधारक बँकेबाहेर जमले होते. खबरदारीचा उपाय म्हणून बँकेच्या दारावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बँक बुडालेली नाही, सर्वांचे पैसे परत मिळतील असं बँक व्यवस्थापनाकडून सांगितलं जात आहे.


पालघरमध्ये बँक मॅनेजरला घेराव

पालघर येथील पीएमसी बँकेच्या शाखेत खातेधारकांचा बँकेच्या मॅनेजरला घेराव घातला. आमचे पैसे आम्हाला मिळणार नसतील तर आम्ही करायचे काय असा सवाल उपस्थित करत खातेधारकांनी बँकेत गोंधळ घातला. खातेधारकांना 3 महिन्यात 1 हजार रुपयेच काढता येणार आहेत, असं बॅंकेकडून सांगण्यात आलं.