मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी एमआयएमने आणखी 5 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. मुंबई आणि मुंबई उपनगरातील हे उमेदवार आहेत. यामध्ये मुंबईतून भायखळाचे विद्यमान आमदार वारीस पठाण यांच्यासह कुर्ला मतदारसंघातून रत्नाकर डावरे, वांदे पूर्वमधून मोहम्मद कुरेशी, अणुशक्तीनगरमधून शाहावाज शेख, तर अंधेरी मतदारसंघातून आरिफ शेख हे एमआयएमचे उमेदवार असणार आहेत, असं एमआयएमने जाहीर केलं आहे. आतापर्यंत एमआयएमकडून 12 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे.


लोकसभा निवडणुकीत एकत्र लढलेले वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम विधानसभेसाठी स्वबळ आजमवणार आहे. एमआयएमने वंचित बहुजन आघाडीपासून वेगळं होण्याची घोषणा केली. मात्र वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमची आघाडी होईल, अशी आशा प्रकाश आंबेडकरांना आहे, त्यासाठी ते प्रयत्नही करत आहेत. एमआयएमकडून आधी तीन त्यानंतर चार आणि आता पुन्हा पाच उमेदवारांची घोषणा केली, त्यामुळे या दोन्ही पक्षांमधील आघाडीची शक्यता काहीशी धुसर दिसत आहे.


एमआयएम पक्ष संविधानाची शपथ घेऊन काम करतो, त्यामुळे आम्ही एमआयएमला धर्मनिरपेक्ष मानतो. एमआयएमसाठी आम्ही दरवाजे कधीच बंद केलेले नाहीत. त्यांनी दरवाजे बंद केलेत आणि त्यांनीच दरवाज्याला टाळे लावले आहेत. त्याची चावी त्यांच्याकडेच आहे. एमआयएमसोबत आमच्या समितीची बोलणी सुरु आहेत, असं प्रकाश आंबेडकर सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं होतं. मात्र, एमआयएमकडून आपल्या उमेदवारांची घोषणा होत असताना पुन्हा दोन्ही पक्षांची आघाडी होईल याची शक्यता कमी दिसत आहे.


एमआयएमकडून रविवारी पुणे छावणीमधून हिना शफीक मोमीन, सोलापूर मध्य येथून फारूख मकबूल शाब्दी, सोलापूर दक्षिणमधून सुफिया तौफिक शेख व सांगोला (सोलापूर) मतदारसंघातून शंकर भगवान सरगर यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. याआधी एमआयएमकडून तीन उमेदवारांची घोषणा करण्यात आली होती. त्यामुळे आतापर्यंत एकूण 12 जागांवरील उमेदवार एमआयएमकडून निश्चित करण्यात आले आहेत.