मुंबई : एकीकडे मुंबईकर आणि मुंबईच्या आसपासच्या महानगरातील सर्व चाकरमानी मुंबई लोकल कधी सुरू होते याच्या प्रतीक्षेत आहेत. अशातच सर्वात महत्त्वाची बातमी समोर आली आहे. लोकल सर्वसामान्यांसाठी कधी सुरु होणार याची प्रतिक्षा सर्वांनाच आहे. दिवाळी नंतरच्या आठवड्यांतील कोरोनाबाबतच्या आकड्यांमधला सकारात्मक कल लक्षात घेता प्रशासनाकडून मुंबईत लोकल सर्वांसाठी खुली करण्यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. येत्या आठवड्यात या संदर्भात महत्त्वपूर्ण पार पडणार आहे. या बैठकीत लोकल सर्वसामान्यांसाठी सुरु करण्याची तारीख निश्चित होऊ शकते.


येत्या आठवड्यात होणाऱ्या बैठकीत राज्य, महापालिका, रेल्वे अधिकारी असणार आहेत. 15 डिसेंबरनंतर सर्वांसाठी लोकलप्रवास खुला करण्यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे."येत्या आठवड्याच्या शेवटी अर्थात 11-12 डिसेंबरला बैठक आयोजित करण्यात आली आहे. यात करोना स्थितीचा आढावा घेऊन लोकल प्रवासाबाबत निर्णय घेण्यात येईल", असे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले आहे.


यापूर्वीच मुंबई महापालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांनी एबीपी माझाशी बोलतांना सांगितले होते की, "15 डिसेंबरला जर मुंबईत कोरोनाच्या स्थिती बिघडलेली नसेल. आकडे सकारात्मक कल दर्शवत असतील, तर 15 डिसेंबर नंतरच सर्वांसाठी लोकल सुरु करता येणे शक्य आहे." त्यामुळे आता मुंबईकरांची लोकल प्रतिक्षा लवकरच संपुष्टात येऊ शकते.


मात्र, लोकल सुरु झाल्यानंतर मास्क वापरणं बंधनकारक असेल. सुट्टीनिमित्त बाहेरगावी गेलेले मुंबईकर आता परतू लागले आहेत. परिणामी सध्या नियंत्रणात असलेला करोना पुन्हा वाढू नये. यासाठी प्रशासनाकडून दक्षता घेण्यात येत आहे.


पाहा व्हिडीओ : सर्वांसाठी लोकल प्रवास लवकरच, 15 तारखेपर्यंत लोकल सुरु होण्याची शक्यता



दिवाळीनंतरच्या आठवड्यातील कोरोनास्थिती पाहून मुंबई लोकलसंदर्भातील निर्णय घेऊ : आयुक्त इकबाल सिंह चहल


दिवाळीनंतरचा हा सध्याचा आठवडा अत्यंत महत्त्वाचा आहे. या आठवड्यात कोरोना बाधितांच्या संख्येत कितपत वाढ होत आहे. हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. कारण गर्दीच्या ठिकाणी लोकांच्या संपर्कात आलेले व्यवसायिक, हॉटेल चालक, भाजी बाजार या प्रत्येक ठिकाणी मुंबई महापालिकेने कोरोना चाचणीची शिबिरं भरवलेली होती. तसेच दिवाळीच्या दिवसांत अनेक नागरिकांनी प्रवास केला आहे. तसेच दिवाळीसाठी गावी गेलेल किंवा सुट्ट्यांसाठी बाहेरगावी गेलेले मुंबईकर आता पुन्हा मुंबईत परतले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्णांचे या आठवड्यातील आकडे कसे असतील? कोरोनाची स्थिती कशी असेल? यावर मुंबई लोकल सुरु करण्याचा कोणताही निर्णय अवलंबून असेल, अशी माहिती मुंबई महापालिका आयुक्त इकबाल चहल यांनी दिली आहे.