मुंबई: भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडण्याची एकही संधी सोडत नाहीत.

खडसेंनी आज मंत्रालयात मोठा उंदीर घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे. तसंच धर्मा पाटील यांनी स्वत:कडील नव्हे तर मंत्रालयातीलच उंदीर मारण्याचं औषध पिऊन आत्महत्या केल्याचा दावा खडसेंनी केला.

खडसेंचा नेमका आरोप काय?

मंत्रालयात 3 लाख 19 हजार 400 उंदीर झाले होते. ते मारण्याचं कॉन्ट्रॅक्ट एका कंपनीला देण्यात आले. 6 महिन्यांत सर्व उंदरांचं निर्मूलन करण्याचं ठरलं होतं.

मात्र 7 दिवसांतरच सर्व उंदीर मारले असल्याचं सांगण्यात आलं. दिवसाला 45 हजार उंदीर मारल्याचं सांगितलं.

पण या उंदरांची विल्हेवाट कशी आणि कुठे लावली याची काही माहिती दिली नाही. त्या कंपनीकडे विष हाताळण्याचा परवाना नव्हता.

मंत्रलायत विष आणण्यास परवानगी नाही. धर्मा पाटील यांनी बाहेरुन विष आणलं नव्हतं. ते त्यांनी मंत्रलयात असलेलं उंदीर मारण्याचं विष घेतलं आणि प्राशन केलं. हा खूप मोठा घोटाळा आहे याची चौकशी करा, अशी मागणी खडसेंनी केली.