मुंबई : फोन टॅपिंगप्रकरणात रश्मी शुक्ला यांच्याविरोधात आरोप झाल्यानंतर मोठी टीका होताना बघायला मिळत आहे. याप्रकरणात माजी खासदार हरीभाऊ राठोड यांनीही रश्मी शुक्लांविरोधात आरोप करत वादात उडी घेतली आहे. पुण्याच्या पोलिस आयुक्त असताना रश्मी शुक्ला पोलीस निरीक्षक धनंजय धुमाळ यांच्यामार्फत खंडणी गोळा करण्याचे काम करायच्या, असा आरोप माजी खासदार हरीभाऊ राठोड यांनी केला आहे.


धुमाळ 2016 मध्ये एटीएसमध्ये कार्यरत असताना त्यांना प्रॉपर्टी सेलमध्ये कार्यरत असल्याचे दाखवत रश्मी शुक्ला यांच्यासाठी खंडणी वसुलीचे काम केल्याचा आरोप राठोडांनी केला आहे. हे प्रकरण गंभीर स्वरुपाचे असतानाही धुमाळांवर कोणतीही कारवाई झाली नाही. त्याचसोबत हे सर्व प्रकरण त्यावेळचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माहित होते. त्यांनीच हे सर्व प्रकरण रफा-दफा केल्याचा आरोप राठोडांनी केला.


धनंजय धुमाळांवर कोणतीही कारवाई नाही
राठोड म्हणाले, पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी पोलीस निरीक्षक धनंजय धुमाळ यांना निलंबित केल्याचं मीडियासमोर सांगितलं होतं. मात्र, माहितीच्या अधिकारात धनंजय धुमाळांवर कोणतीही कारवाई आतापर्यंत झाली नसल्याचं उजेडात आलं आहे. धुमाळ निवृत्त होण्यापूर्वीच त्यांना स्वेच्छानिवृत्ती मंजूर करण्यात आली आहे. हे प्रकरण माध्यमांसमोर आल्यानंतर रश्मी शुक्ला यांनी धुमाळ यांचे निलंबन केल्याचं म्हंटलं होतं. त्याचसोबत सदर फुटेजची सीडी फॉरेन्सिक लॅबला पाठवत त्यासंबंधी शहानिशा करु असं देखील म्हंटलं होतं. मात्र, यातील एकही गोष्ट शुक्ला यांनी केली नाही. 


कडक कारवाई करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
रश्मी शुक्ला नागपूरमध्ये असताना पोलीस उपायुक्त होत्या. त्यावेळी त्यांचे आणि माजी  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे संबंध चांगले होते. त्यामुळे देवेंद्र फडणवीस रश्मी शुक्लांना नेहमी अभय देत असत. हे प्रकरण देखील माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वरदहस्तामुळे दाबून टाकण्यात आले. त्यामुळे रश्मी शुक्ला ह्या भाजपच्या एजंट म्हणून काम करायच्या हे यावरुन देखील सिद्ध होतं असा गंभीर आरोप देखील त्यांनी केला आहे.  


याप्रकरणी रश्मी शुक्लांविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी माजी खासदार हरीभाऊ राठोड यांनी केली आहे. या संबंधीचे सर्व पुरावे मुख्यमंत्र्यांना देत रश्मी शुक्लांविरोधात कडक कारवाई व्हावी यासाठी आग्रही भूमिका घेणार असल्याचंही राठोड म्हणालेत.   


काय आहे प्रकरण?
2016 साली पुण्यातील एक बांधकाम व्यावसायिक संदीप जाधव यांना तत्कालीन पोलीस निरीक्षक धनंजय धुमाळ यांनी 25 लाखांच्या खंडणीची मागणी केली होती. याप्रकरणी, जाधव यांनी व्हीडिओ क्लिप काढत धुमाळ यांची तक्रार केली होती. मात्र, याप्रकरणी तत्कालीन पुणे पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी कारवाई केली नव्हती. ही व्हीडिओ क्लिप माध्यमात आल्यानंतर माध्यमांनी हे प्रकरण चांगलंच लावून धरलं होतं.