कल्याण : पतीच्या मित्रांनीच पैसे देण्याच्या बहाण्यानं महिलेला घरी बोलावून सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना कल्याणमध्ये घडली आहे. कल्याणच्या द्वारली गावात ही घटना घडली असून, दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. हे दोन्ही आरोपी मुंबईतील बेस्ट बसचे चालक आहेत.

आरोपींची नावं सुनील मोरे आणि अरविंद कुंभार अशी असून हे दोघंही पीडित महिलेच्या पतीचे मित्र आहेत. यापैकी सुनील मोरे याच्याकडे पीडित महिलेच्या पतीनं 10 हजार रुपये उसने मागितले होते. हे पैसे घेण्यासाठी मोरे याने मित्राच्या बायकोला बुधवारी त्याच्या द्वारली पाड्यातील घरी बोलावलं आणि तिथे तिच्यावर मोरेसह अरविंद कुंभारने बलात्कार केला.

या सगळ्या प्रकाराचं त्यांनी मोबाईलमध्ये चित्रीकरणही केलं. यानंतर पीडितेनं शुक्रवारी अरविंद कुंभार याचा हा मोबाईल मिळवला आणि थेट पोलिसांत धाव घेतली.

या प्रकरणी हिललाईन पोलिसांनी या दोन्ही नराधमांना बेड्या ठोकल्या असून त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.