वसई : वसईतील खंडणीखोर डॉक्टर अनिल यादव प्रकरणात मोठा खुलासा झाला आहे. याप्रकरणात एनकाऊंटर स्पेशालिस्ट माजी पोलीस अधिकारी सचिन वाझेंचंही नावही समोर आलं. सचिन वाझेंना याप्रकरणी आरोपी केल्याचं स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागानं वसई कोर्टात सांगितलं आहे.
नवघर आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ.अनिल यादवच्या चौकशीत सचिन वाझेंचं नाव पुढे आलं आहे. डॉ. यादव फरार असताना, सचिन वाझेंनी त्याला मोबाईल नष्ट करण्याचा सल्ला दिल्याचं त्यानं सांगितलं आहे.
तसंच यादवला गुजरातहून आणण्यासाठी वाझेंनी गाडीही पाठवल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे वाझेंनी खंडणीखोर डॉ.यादवला मदत केल्याचं उघड झाल्यानं वाझेंनाही याप्रकरणी आरोपी बनवल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
तर दुसरीकडे वसईचे शिवसेनेचे वादग्रस्त नगरसेवक धंनजय गावडे यांनाही चौकशीसाठी पोलिसांनी नोटीस बजावली होती. पण अद्याप स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागासमोर हजर झाले नाहीत.
दरम्यान, या प्रकरणातील मुख्य आरोपी डॉ. अनिल यादवला न्यायालयाने 30 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.