मोखाडा (पालघर): पालघर जिल्ह्यातील मोखाडा येथे एका भोंदूबाबाने आपल्या साथीदारांच्या मदतीनं एका तरुणीचं अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यासंबंधी पीडित तरुणीनं पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
त्र्यंबकमुनी मंगलमुनी दास असं या भोंदूबाबाचं नाव असून त्याच्या या कृत्यात मोखाडा नगर पंचायतीच्या महिला नगराध्यक्षा मंगला चौधरी आणि त्यांचा मुलगा संदीप चौधरी हा देखील सामील असल्याचा आरोप पीडित तरुणीनं केला आहे. याप्रकरणी या दोघांनाही अटक करण्यात आली आहे. प्रमुख आरोपी त्र्यंबकमुनी मंगलमुनी दास हा सध्या फरार आहे.
एका व्याधीनं त्रस्त असलेल्या या तरुणीला मंगला चौधरी यांच्या ओळखीनं भोंदूबाबाकडे नेण्यात आलं. त्याचवेळी भोंदूबाबानं तरुणीला लग्नासाठी विचारणा केली. मात्र, तिने लग्नाला नकार दिला. त्यानंतर भोंदूबाबानं शिष्यांच्या मदतीने तरुणीचं कॉलेजमधून अपहरण केले आणि डहाणू इथे नेऊन तिच्यावर मर्जीविरुद्ध तिच्याशी लग्न केलं.
काही दिवसांनी पुन्हा एकदा तरुणीचे अपहरण करण्यात आलं आणि तिला गुजरातला नेऊन भोंदू बाबाने तिच्यावर अनेक वेळा बलात्कार केला. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी भोंदूबाबासह त्याच्या 11 सहाकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला असून आतापर्यंत 8 जणांना अटक करण्यात आली आहे.