शिल्पा शेट्टीसह राज कुंद्राला अटकपूर्व जामीन, कुंद्राची चौकशी
एबीपी माझा वेब टीम | 11 May 2017 07:47 AM (IST)
भिवंडी : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि पती राज कुंद्रा यांना ठाणे सत्र न्यायालयाने तूर्तास दिलासा दिला आहे. 24 लाखांच्या फसवणुकीप्रकरणी दोघांना अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे. त्यानंतर राज कुंद्राने भिवंडीच्या कोनगाव पोलिस ठाण्यात हजेरी लावत आपला जबाब नोंदवला. राज कुंद्रा आणि कंपनीचे संचालक दर्शित शाह यांनी भिवंडी पोलिस ठाण्यात हजेरी लावत जबाब नोंदवला. जवळपास तीन तास त्यांची चौकशी झाल्याची माहिती आहे. गुरुवार आणि शुक्रवारीही त्याला हजेरी लावावी लागणार आहे. भिवंडीचे कापड व्यावसायिक रवी भालोटिया यांनी राज कुंद्रासह शिल्पा शेट्टी आणि बेस्ट डील टीव्ही कंपनीच्या 3 संचालकांविरोधात 24 लाखांच्या फसवणुकीची तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी ठाणे सत्र न्यायालयानं सर्वांना अटकपूर्व जामीन मंजूर केला. काय आहे प्रकरण? भिवंडीतील सरावली एमआयडीसी परिसरात रवी मोहनलाल भालोटिया यांच्या मालकीची 'भालोटिया एक्स्पोर्ट' कंपनी आहे. या ठिकाणी भालोटिया बेडशीट तयार करतात. शिल्पा शेट्टी, तिचे पती राज कुंद्रा व भागीदार दर्शित इंद्रवन शाह, उदय कोठारी यांची बेस्ट डील टीव्ही प्रा. लि. ही ऑनलाईन कंपनी आहे. त्या माध्यमातून जुलै 2015 ते मार्च 2016 या कालावधीत भालोटिया एक्स्पोर्ट कंपनीकडून वेगवेगळ्या कॉल सेंटरमधून ईमेलने ऑर्डर नोंदवून वेळोवेळी बेडशीट विक्रीसाठी घेतल्या होत्या.