मुंबई : मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रान्चने कार डिझायनर दिलीप छाब्रिया यांची बहिण कंचनला फसवणुकीच्या प्रकरणात अटक केली आहे. कंचन ही 'दिलीप छाब्रिया डिझाईन प्रायव्हेट लिमिटेड' या कंपनीची सीईओ आहे. हे प्रकरण कॉमेडियन कपिल शर्माच्या 2017 मधील व्हॅनिटी व्हॅनच्या ऑर्डरशी संबंधित आहे.


कपिलने 5.7 कोटी रुपये दिले
कपिल शर्माने दिलीप छाब्रिया आणि त्याच्या कंपनीविरोधात फसवणुकीची तक्रार नोंदवली होती. त्यानंतर याविरोधात गुन्हा दाखल झाला होता. कपिलने आपल्या तक्रारीत म्हटलं आहे की, 2017 मध्ये मी दिलीप छाब्रिया यांच्या कंपनीला एक व्हॅनिटी व्हॅन डिझाईन करण्यासाठी 5.7 कोटी रुपये दिले होते. परंतु अजूनही ही व्हॅनिटी अद्याप मिळालेली नाही. या प्रकरणात कंपनीसाठी सीनियर सेल्स एक्झिक्युटिव्हचं काम करणाऱ्या निहाल बजाजला ही अटक करण्यात आली आहे.


रेस्टॉरंटमधून अटक
मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रान्चच्या क्राईम इंटेलिजन्स युनिटने कंचनला बुधवारी (27 जानेवारी) एक रेस्टॉरंटमधून अटक केली. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, कंचन अटकेपासून वाचण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत होती. अखेर पोलिसांनी तिचं लोकेशन शोधून तिला मरिन ड्राईव्हजवळच्या एका रेस्टॉरंटमधून अटक केली आहे. तिला आणि निहाल बजाज यांना आज कोर्टात हजर केलं जाईल.


दिलीप छाब्रिया यांना मागील महिन्यात बेड्या
मागील महिन्यात क्राईम इंटेलिजन्स युनिटने मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर दिलीप छाब्रिया यांना अटक केली होती. त्यांच्याविरोधात तीन गुन्हे दाखल असून त्यात 100 कोटी रुपयांच्या आर्थिक घोटाळ्याचाही समावेश आहे. त्याने बनवलेल्या अनेक गाड्यांची विविध आरटीओमध्ये बनावट नोंद केलं आणि खोट्या कागदपत्रांच्या आधारावर फायनान्शियल कंपन्यांकडून कर्ज उचललं होतं. याशिवाय चेन्नईच्या एका व्यक्तीने 25 कोटी रुपये आणि कपिल शर्माने 5.7 कोटी रुपयांच्या फसवणुकीची तक्रार दाखल केली होती.